bacchu-kadu-warns-to-protest-at-forest-minister’s-house : मेळघाटातील प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आवाहन
Amravati मेळघाटातील विविध प्रलंबित प्रश्नांवरून सुरू असलेल्या संघर्ष महापदयात्रेला आता आक्रमक वळण मिळाले आहे. हजारो समर्थकांसह आमदार बच्चू कडू यांनी जारीदा येथील वनविभागाच्या कार्यालयाला घेराव घालत प्रशासनाचे लक्ष वेधले. वनपरवानग्यांअभावी पाणी, रस्ता, वीज आणि आरोग्य सुविधांची कामे रखडल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
रंगूबेली व परिसरातील पाच गावांसाठीची पाणीपुरवठा योजना वनविभागाच्या परवानगीअभावी रखडली असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. राणीगाव येथे जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असतानाही अंतिम टप्प्यात वनविभागाचा अडथळा निर्माण झाला आहे. सुमारे तीन कोटी रुपयांचे काम पूर्ण होऊनही योजना कार्यान्वित होत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.
बोराट्याखेडा व रेहट्याखेडा येथे पाण्याच्या टाक्या उभ्या आहेत; मात्र अवघ्या २०० मीटर पाइपलाईनसाठी वनपरवानगी न मिळाल्याने योजना अर्धवट अवस्थेत आहे. डोमी येथील रस्त्याचे कामही वनविभागाच्या मंजुरीअभावी थांबले आहे. चिलाटी, सुमिता व कुटीदा या गावांमध्ये विजेचे पोल टाकण्यास परवानगी न मिळाल्याने काही वस्त्यांमध्ये आजही अंधाराचे साम्राज्य आहे.
PWD road fund : नगरपरिषदेला डावलून निधी PWD कडे; ५ कोटींच्या निधीवरून राजकीय वाद
इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात विहीर खणण्यासाठीही वनविभागाची परवानगी मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली. एकताई येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी मंजूर असूनही वनपरवानगी नसल्याने बांधकाम सुरू होऊ शकलेले नाही, हेही मुद्दे बैठकीत मांडण्यात आले.
या सर्व प्रश्नांवर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. मात्र बैठकीतील मुद्द्यांवर तातडीने तोडगा न निघाल्यास थेट केंद्रीय वनमंत्री किंवा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.








