Devendra-fadnavis-first-cm-to-present-state-budget : अजित पवारांच्या निधनानंतर सांभाळली अर्थखात्याची धुरा; पायाभूत सुविधा आणि शेतीवर विशेष भर मिळण्याची शक्यता
Mumbai २०२६–२७ या आर्थिक वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यंदाचा अर्थसंकल्प मांडणार असून, राज्याच्या आर्थिक नियोजनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस दुसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस हे अर्थ संकल्प सादर करणारे पहिले मुख्यमंत्री ठरणार आहेत.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आर्थिक जबाबदाऱ्यांमध्ये बदल झाला आहे. त्यामुळे यावेळी अर्थसंकल्प सादर करण्याची मोठी जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आली असून, याकडे राजकीय तसेच प्रशासकीय दृष्टिकोनातून विशेष लक्ष दिले जात आहे.
यंदाचा अर्थसंकल्प अनेक कारणांमुळे महत्त्वाचा मानला जात आहे. राज्यातील पायाभूत सुविधा, शेती, उद्योग, रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कल्याण या क्षेत्रांवर सरकारचा विशेष भर असणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्यातील वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि आर्थिक गरजा लक्षात घेऊन विविध विकास प्रकल्पांसाठी मोठ्या तरतुदी करण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Iran israel war : इराण-इस्रायल युद्धाच्या झळा पोचल्या महाराष्ट्रात!
राज्य सरकारकडून आगामी वर्षात पायाभूत सुविधा क्षेत्राला प्राधान्य मिळण्याचे संकेत मिळत असून मेट्रो प्रकल्प, महामार्ग, ग्रामीण रस्ते, सिंचन प्रकल्प आणि औद्योगिक कॉरिडॉर यांसारख्या मोठ्या प्रकल्पांसाठी निधी वाढवण्याचा सरकारचा विचार आहे. यामुळे राज्यातील उद्योग व गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
शेतकऱ्यांसाठी विविध योजनांचा विस्तार, कृषी उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि कृषी पायाभूत सुविधा मजबूत करण्यावरही या अर्थसंकल्पात भर दिला जाऊ शकतो. ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती आणि शेतीपूरक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी नव्या योजना जाहीर होण्याची शक्यता आहे.
महिलांसाठी स्वयंसहायता गटांना आर्थिक मदत, कौशल्य विकास कार्यक्रम आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणा यांसारख्या योजनांचाही यात समावेश असू शकतो. तसेच, मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक यांसारख्या प्रमुख शहरांमधील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मेट्रो विस्तार, स्मार्ट सिटी प्रकल्प आणि पर्यावरणपूरक विकास या विषयांवर विशेष घोषणा होण्याची शक्यता आहे.
राज्याचा अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक दुपारी १ वाजता विधानभवनात पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून, अर्थसंकल्पातील मुख्य तरतुदींवर यात चर्चा केली जाईल.
दरम्यान, अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे आज विधानसभेत अर्थसंकल्पावर जोरदार चर्चा आणि खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.








