Naresh Arora : “बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो”; नरेश अरोरा कुठे गायब झाले?

amol-mitkari-question-on-naresh-arora-after-ajit-pawar-death : अजित दादांच्या निधनानंतर त्यांच्या अनुपस्थितीवर अमोल मिटकरींचा सवाल

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी पक्षाच्या प्रचार मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणारे डिझाईन बॉक्सचे प्रमुख नरेश अरोरा यांच्या अचानक अनुपस्थितीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. अजित दादांच्या विमान अपघातानंतर काही दिवस दिसलेले नरेश अरोरा सध्या कुठे आहेत, असा सवाल करत मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्टही शेअर केली आहे.

मिटकरी यांनी आपल्या पोस्टमध्ये नरेश अरोरा यांचा फोटो शेअर करत “दादांच्या विमान अपघातानंतर सध्या हे महाशय कुठे आहेत? त्यांच्या विचारांकडे महाराष्ट्राचे दुर्लक्ष होत आहे का? आता महाराष्ट्राने त्यांचा शोध घ्यायलाच पाहिजे” अशा आशयाचा मजकूर लिहिला होता. या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून मिटकरी नेमके काय म्हणू इच्छितात याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते.

Ajit Pawar memorial : अजित पवार यांच्या नावाने संस्था-स्मारकांसाठी कुटुंबाची परवानगी बंधनकारक; गैरवापर टाळण्यासाठी नवा निर्णय

मुंबईत माध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले की, पक्षाच्या निवडणूक मोहिमेतील अनेक महत्त्वाच्या बाबी नरेश अरोरा सांभाळत होते. त्यांनीच अजित दादांना गुलाबी जॅकेट दिले होते तसेच पुष्पगुच्छ देत त्यांच्या खांद्यावर हात ठेवला होता. संपूर्ण पक्षाची निवडणूक रणनीतीही तेच ठरवत होते. मात्र अजित दादांच्या निधनानंतर ते केवळ एक-दोन दिवस दिसले आणि त्यानंतर कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे ते नेमके कुठे आहेत हा प्रश्न पडल्यानेच आपण ट्वीट केल्याचे मिटकरी यांनी सांगितले.

मिटकरी म्हणाले की, नरेश अरोरा सध्या महाराष्ट्रात आहेत की देशाबाहेर आहेत याबाबत कोणतीही माहिती नाही. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतरही ते कुठे दिसले नाहीत. अशा कठीण प्रसंगी त्यांनी पक्षासोबत राहायला हवे होते आणि काहीतरी प्रतिक्रिया द्यायला हवी होती. परंतु त्यांच्या बाजूने कोणतीही पोस्ट किंवा प्रतिक्रिया दिसली नाही. त्यामुळे ते नेमके कुठे आहेत असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

यावेळी बोलताना मिटकरी यांनी असेही म्हटले की, कदाचित त्यांचा काही कॉन्ट्रॅक्ट असेल, परंतु याबाबत आपल्याला निश्चित माहिती नाही. आपण असे बोलल्यानंतर पक्षातील काही नेते नाराज होतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. मात्र त्यांच्याकडून आपल्याला कोणताही फोन आलेला नाही आणि आपणही त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही, असेही मिटकरी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान विधानसभेत अजूनही अजित पवार यांच्या अपघाताबाबत चर्चा झालेली नाही, याबाबतही मिटकरी यांनी नाराजी व्यक्त केली. सध्याच्या आठवड्यातील फक्त दोन दिवस कामकाजाचे आहेत आणि पुढील आठवड्यात सुट्ट्या असल्याने अधिवेशन संपेल. त्यामुळे या विषयावर चर्चा घडवून आणण्याची इच्छाच नसल्याचे चित्र दिसत असल्याची टीकाही त्यांनी केली.

Akola municipal corporation : अकोला महापालिकेतील ‘क्लब टेंडर’वरून वाद

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नरेश अरोरा यांनी अजित दादांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना पुष्पगुच्छ दिला होता. त्यावेळी आपण त्यांना ‘सोल्जर नाही, तुम्ही सॅलरी सोल्जर आहात’ असे म्हटले होते, असेही मिटकरी यांनी सांगितले. व्हीएसआर अहवालावरही त्यांनी काही प्रतिक्रिया दिलेली नाही, त्या संदर्भातील कंटेंट देण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती, असे सांगत “बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो” असे म्हणत नरेश अरोरा नेमके कुठे आहेत असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.