Bomb threat email : विधानभवनाला बॉम्बने उडवण्याची धमकी

bomb-threat-email-vidhan-bhavan-bse-high-court-mumbai-security-search : ईमेलमुळे मुंबईत खळबळ, बीएसई-उच्च न्यायालयासह चार ठिकाणे टार्गेट

Mumbai : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल आल्यामुळे गुरुवारी सकाळी दक्षिण मुंबईत एकच खळबळ उडाली. या धमकीमध्ये केवळ विधानभवनच नव्हे, तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई उच्च न्यायालय आणि मेट्रो यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांचाही उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाल्या असून संपूर्ण परिसरात उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ६ वाजून ५७ मिनिटांनी ‘सीपीए’च्या अधिकृत ईमेल आयडीवर हा धमकीचा संदेश प्राप्त झाला. या ईमेलमध्ये विधानभवनासह मुंबईतील काही महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्ब आणि मिसाईलने उडवून देण्याचा इशारा देण्यात आला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने प्रशासनाने या धमकीची गंभीर दखल घेत तात्काळ तपास आणि सुरक्षा तपासणी सुरू केली.

Devendra fadanvis : मुनगंटीवारांच्या विक्रमी वृक्षलागवडीची आठवण; पुन्हा हरित महाराष्ट्राचा संकल्प

धमकीचा ईमेल मिळताच पोलिसांनी संपूर्ण विधानभवन परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले. सुरुवातीला सुरक्षेच्या कारणास्तव विधानभवनातील कर्मचारी आणि इतरांना प्रवेश रोखण्यात आला होता. त्यानंतर ओळखपत्र तपासणी आणि सुरक्षा पडताळणी केल्यानंतरच कर्मचाऱ्यांना आत सोडण्यात आले. बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथक तसेच राज्य राखीव पोलीस दलाची पथके घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी परिसराची कसून तपासणी केली.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांगितले की, सकाळी ईमेलद्वारे धमकी प्राप्त झाली असून त्यामध्ये बॉम्ब आणि मिसाईलचा उल्लेख करण्यात आला आहे. विधानभवनासह आणखी चार ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. सुरक्षा यंत्रणा संपूर्ण तपास करत असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

धमकीच्या ईमेलमध्ये विधानभवनाबरोबरच आशियातील महत्त्वाच्या शेअर बाजारांपैकी एक असलेल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचाही उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी बीएसई इमारतीतही तातडीने शोधमोहीम सुरू केली. इमारतीतील प्रत्येक मजल्याची तपासणी करण्यात आली असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही, मात्र खबरदारी म्हणून सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्यात आली आहे.

धमकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही कडक पावले उचलली आहेत. त्यांनी त्या दिवशीसाठी विधानभवनात अभ्यागतांना प्रवेशबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला असून सर्व प्रकारचे अभ्यागत पास तात्पुरते रद्द करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Ravindra chavan : विधीमंडळात दांडी मारणाऱ्या आमदारांना रविंद्र चव्हाण यांचा इशारा

प्राथमिक तपासात हा ईमेल खलिस्तानी आंदोलनाशी संबंधित व्यक्तीकडून पाठवला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नसून या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा आणि सायबर सेल करत आहेत. ईमेल नेमका कुठून पाठवण्यात आला आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अशी धमकी आल्यामुळे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. पोलिसांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले असून संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगितले आहे.