Sudhir Mungantiwar makes a strong, well-researched pitch for New Chandrapur’s infrastructure development : नवीन चंद्रपूरसाठी १४५ कोटींच्या पायाभूत प्रकल्पाला मंजुरीची मागणी; सरकारची सकारात्मक भूमिका
Mumbai: नवीन चंद्रपूरच्या नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकासाचा मुद्दा विधानसभेत जोरदारपणे उपस्थित करत राज्याचे माजी वने, सांकृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले.आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकल्पाला अपेक्षित गती मिळत नसल्याबाबत चिंता व्यक्त केली. १९९८ साली विशेष नियोजन प्राधिकरण स्थापन करूनही नवीन चंद्रपूरच्या विकासाच्या कामांना पुरेशी गती मिळालेली नाही, असे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. वाढत्या लोकसंख्येच्या आणि नागरी विस्ताराच्या पार्श्वभूमीवर नवीन चंद्रपूरमध्ये पायाभूत सुविधा मजबूत करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नवीन चंद्रपूरच्या नियोजनामध्ये रुंद रस्ते, अखंड वीज आणि पाणीपुरवठा, सक्षम ड्रेनेज व्यवस्था, कचरा व्यवस्थापन प्रणाली तसेच नागरिकांसाठी उद्याने आणि हरित क्षेत्रे उभारण्याची तातडीची गरज असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधिकरणाला अधिक अधिकार देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच जमीन लिलावातून मिळालेला निधी स्थानिक विकासासाठी वापरण्यात यावा, अशीही त्यांनी मागणी केली.
Sudhir mungantiwar : चंद्रपूरच्या ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिर देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा !
या संदर्भात वीज, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि रस्ते विकासासाठी तयार करण्यात आलेल्या सुमारे १४५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला तातडीने मंजुरी देण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली. त्याचबरोबर नवीन चंद्रपूरच्या विकासकामांना नियोजनबद्ध दिशा देण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या विषयावर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत मुंबई येथे बैठक घेण्याचीही आवश्यकता असल्याचे त्यांनी सूचित केले.
दरम्यान, या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेले मुद्दे महत्त्वाचे आणि रास्त असल्याचे सांगत सरकारकडून सकारात्मक भूमिका स्पष्ट केली. नवीन चंद्रपूरच्या विकासासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Sudhir mungantiwar: चंद्रपूर-गडचिरोलीतील आदिवासींच्या हक्कांचा प्रश्न विधानसभेत
रस्ते विकासासह वीज, पाणी आणि ड्रेनेज सुविधांसाठी प्रस्तावित १४५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला वित्त विभागाकडून मंजुरी मिळवण्यासाठी लवकरात लवकर पाठपुरावा करण्यात येईल, असेही भोयर यांनी सभागृहात सांगितले. तसेच चालू अधिवेशन संपण्यापूर्वी मुंबई येथे सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नवीन चंद्रपूरच्या विकास प्रकल्पांना गती देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.








