व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Kumbh Mela 2027 : कुंभमेळ्यात हिंदू वगळता इतरांनी स्टॉल लावू नये; लावल्यास...

Kumbh Mela 2027 : कुंभमेळ्यात हिंदू वगळता इतरांनी स्टॉल लावू नये; लावल्यास उखडून टाका

nitesh-rane-controversial-statement-about-stalls-in-kumbh-mela-nashik : नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याने नवा वाद

Nashik: आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. कुंभमेळ्यात हिंदू सोडून इतर कोणालाही स्टॉल लावू देऊ नका, कोणी स्टॉल लावण्याचा प्रयत्न केला तर तो स्टॉलसकट उखडून टाका, आम्ही मंत्रालयात बसलो आहोत, असे वक्तव्य नितेश राणे यांनी केले. नाशिक येथे हिंदू हित रक्षकच्या वतीने तयार करण्यात आलेल्या हिंदू व्यावसायिक आणि कामगारांच्या सूचीचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

नितेश राणे म्हणाले की, हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी केली पाहिजे ही संकल्पना मांडणाऱ्यांचे ते स्वागत करतात. यापूर्वी खारघर येथेही त्यांनी अशीच भूमिका मांडली होती. त्या वेळी परिसरात अनेक जिहादी लोकांची दुकाने असल्याचे त्यांनी सांगितले. आपण त्या विषयावर बोलल्यानंतर माध्यमांनी टीका केली, मात्र त्यावेळीही त्यांना काही फरक पडला नाही आणि आजही पडत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. हिंदू राष्ट्रात हिंदूंबाबत बोलायचे नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पाकिस्तान किंवा इस्लामाबादबद्दल बोलायचे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करत आपल्यावर धर्मांधतेचे आरोप करणाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन उत्तर द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले.

Devendra fadnavis : जगातील संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये असल्याचे अमेरिकेतील नेत्यांचेही मत

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी पुढे सांगितले की, कुंभमेळ्याच्या निमित्ताने कोणीही हिंदू नसलेला व्यक्ती दुकान लावणार नाही याची खबरदारी घ्यावी. सध्या रमजान सुरू आहे आणि त्या काळात त्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने लागतात, मात्र त्या ठिकाणी एकतरी हिंदू माणूस दिसत नाही, असे ते म्हणाले. त्यांच्या धार्मिक ग्रंथात काफिरांकडून काही घेऊ नये असे लिहिले असल्याचा दावा त्यांनी केला आणि त्यामुळे ते जसे वागतात तसेच आपण वागलो तर त्यात वेगळे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

यावेळी बोलताना नितेश राणे यांनी असा दावा केला की त्यांनी कुराण दोन वेळा वाचले असून त्यामध्ये जकात देण्याबाबत उल्लेख आहे. हा पैसा जिहादसाठी वापरला जातो, असा आरोपही त्यांनी केला. काही लोकांना २०४७ पर्यंत भारताला मुस्लीम राष्ट्र बनवायचे आहे, असा आरोप करत अशा परिस्थितीत त्यांच्या दुकानांतून वस्तू खरेदी करणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

कुंभमेळ्याच्या तयारीच्या कामांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, या मेळ्यात एकही जिहादी आला नाही पाहिजे आणि त्यांना भीती वाटली पाहिजे. यापूर्वी त्र्यंबकेश्वर येथे गेलो असताना एका दुकानावर वेगळे नाव होते, मात्र आतमध्ये अब्दुल नावाचा व्यक्ती बसलेला होता, असे त्यांनी सांगितले. यामुळे आता हिंदूंनी हिंदूंकडूनच वस्तू खरेदी कराव्यात यासाठी देशभर मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.

Coal minister G kishan Reddy : जमीन देणाऱ्या स्थानिकांनाच प्रकल्पात रोजगार द्या; केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी यांचे स्पष्ट निर्देश

नाशिकमध्ये जय श्रीरामच ऐकू येणार आणि आय लव्ह मोहम्मद ऐकू येणार नाही, असेही ते म्हणाले. कुंभमेळ्यात लक्ष ठेवा आणि कोणी स्टॉल लावण्यासाठी आले तर तो स्टॉलसकट उखडून टाका, आम्ही मंत्रालयात बसलो आहोत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच राज्यात धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची प्रक्रिया सुरू असून लव्ह जिहादविरोधात सर्वात कडक कायदा आणला जाईल, असेही त्यांनी सांगितले. हे सरकार हिंदू समाजाने निवडून दिले असून आम्ही काही विशिष्ट मोहल्ल्यांमध्ये जाऊन मत मागितले नाही, असेही नितेश राणे यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

error: Content is protected !!