mla-pravin-tayde-attacks-on-bacchu-kadu : आमदार प्रवीण तायडे यांचा हल्लाबोल; संपत्तीची चौकशी करण्याची मागणी
Amravati राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी विधानसभेत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली. या घडामोडींमुळे अचलपूरमध्ये पुन्हा एकदा भाजप विरुद्ध प्रहार असा राजकीय संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अधिवेशनादरम्यान आपल्या मतदारसंघातील विविध मागण्या मांडताना तायडे यांनी थेट बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला.
तायडे यांनी आरोप करताना म्हटले की, “बच्चू कडूंनी संपूर्ण आयुष्य नौटंकी करण्यात घालवले. गरीब असल्याचे नाटक करायचे, सरकारमधील सूत्रांकडून माहिती मिळवायची, आंदोलनांच्या तारखा जाहीर करायच्या आणि नंतर कर्जमाफीचे श्रेय लाटायचे, हाच त्यांचा उद्योग आहे.”
ते पुढे म्हणाले की, बच्चू कडू तब्बल अडीच वर्षे मंत्री होते आणि सुमारे २० वर्षे सत्तेसोबत होते. मग बंद पडलेले सिंचन प्रकल्प सुरू का करता आले नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यातून शेतकऱ्यांबाबत त्यांची उदासीनता स्पष्ट होते, असा आरोपही तायडे यांनी केला.
तायडे यांनी सर्वात गंभीर आरोप करताना म्हटले की, “माझे बनावट लेटरहेड वापरून अचलपूर मतदारसंघाचा निधी मोर्शी मतदारसंघात वळवण्याचे षडयंत्र रचण्यात आले.” या कथित बनावट दस्तावेज प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
तायडे यांनी विधानसभेतच बच्चू कडू यांच्या मागील २० वर्षांतील संपत्ती, निधीचा वापर आणि आंदोलनांमागील सत्याची चौकशी करण्याची मागणी केली. “या संदर्भातील माहिती देण्यासाठी मी तयार आहे,” असे सांगत त्यांनी तपास यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी करावी, असे आवाहन केले.
Prataprao Jadhav : ‘भावी खासदार’च्या पोस्टरने प्रतापरावांची वाढवली चिंता!
तसेच लोकांचे लक्ष स्वतःकडे वळवण्यासाठी बच्चू कडू मुख्यमंत्रीांवर खालच्या पातळीची टीका करतात. असे वर्तन नेतृत्वाला शोभणारे नाही, असेही त्यांनी नमूद केले. वारंवार असे प्रकार घडत असल्याने आमचा व कार्यकर्त्यांचा संयम सुटत चालला असून याला जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशाराही तायडे यांनी दिला.








