congress-set-target-for-voters-registration-to-151-candidates : पदवीधर निवडणूकीत काम न करणाऱ्यांचे तिकीट कापणार
Nagpur विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठा पराभव पत्करावा लागल्यानंतरही आगामी नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली असून आपली आशा कायम ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिकेच्या निवडणुकीत ज्यांना ज्यांना पक्षाने उमेदवारी दिली होती, अशा सर्व १५१ जणांना दरमहा मतदार नोंदणीचे कडक ‘टार्गेट’ देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, या कामाचा दर आठवड्याला आढावा घेतला जाणार असून, जे नोंदणी करणार नाहीत त्यांचे आगामी निवडणुकीचे तिकीट कापले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. केवळ निवडणुकीच्या काळात देवडिया भवनात दिसणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची एक प्रकारे ‘कसोटी’ घेण्याचेच काँग्रेसने ठरवल्याचे दिसत आहे.
LPG crisis : दोन दिवसांत बंद होऊ शकतात हॉटेल्स, कॅटरिंगही धोक्यात!
यापूर्वी महाविकास आघाडीच्या कार्यकाळात झालेल्या पदवीधर निवडणुकीत काँग्रेसने अभिजीत वंजारी यांना मैदानात उतरवले होते. त्यांच्या विरोधात भाजपने तत्कालीन आमदार अनिल सोले यांचे तिकीट कापून ऐनवेळी संदीप जोशी यांना उमेदवारी दिली होती, ज्यामुळे भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली होती. या मतदारसंघाच्या स्थापनेपासून भाजपचा उमेदवार कधीही पराभूत झाला नव्हता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर त्यांचे राजकीय वारसदार अनिल सोले यांनीही हा बालेकिल्ला शाबूत ठेवला होता.
मात्र, गेल्या निवडणुकीत अभिजीत वंजारी यांनी संदीप जोशी यांचा पराभव करून भाजपला मोठा धक्का दिला आणि ऐतिहासिक विजयाची नोंद केली. त्यावेळी राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता आणि सुनील केदार, नितीन राऊत यांच्यासह विदर्भातील नेत्यांनी बांधलेली ‘वज्रमुठ’ वंजारी यांच्या विजयासाठी निर्णायक ठरली होती.
सध्या राज्यात महायुतीची सत्ता असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. भाजपने माजी आमदार सुधाकर कोहळे यांची मतदार नोंदणी प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. भाजपमध्ये नोंदणी प्रमुखालाच उमेदवारी देण्याची परंपरा पाहता, आगामी निवडणुकीत सुधाकर कोहळे विरुद्ध अभिजीत वंजारी असा सामना रंगण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसने आतापासूनच या निवडणुकीत लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी देवडिया भवनात महापालिकेच्या १५१ उमेदवारांची बैठक घेतली.
Akola Municipal corporation : स्वाती कंपनीमुळे करदात्यांवर दुहेरी आर्थिक भार
या बैठकीत प्रत्येकाला दरमहा किमान २५० ते ३०० पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांना काम करायचे नाही त्यांनी आताच सांगा, आम्ही दुसऱ्याची नियुक्ती करू; मात्र काम न करणाऱ्यांना महापालिकेची उमेदवारी मिळणार नाही, अशा कडक शब्दांत ठाकरे यांनी इच्छुकांचे कान टोचले आहेत. मागील निवडणुकीत वंजारी २० हजार मतांनी निवडून आले होते, यावेळी हा विजय ५० हजारांच्या फरकाने मिळवण्याचा संकल्प काँग्रेसने सोडला आहे.








