ahilyanagar-tarkeshwar-gad-adinath-maharaj-self-harm-shocking-revelation : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांचा धक्कादायक खुलासा
Ahilyanagar : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्याबाबत समोर आलेल्या धक्कादायक माहितीनंतर अहिल्यानगरसह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या आठवड्यात जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल झालेल्या महाराजांनी आता स्वतःहून जननेंद्रियाचा त्याग केल्याची कबुली दिल्याने या प्रकरणाभोवतीचे गूढ अधिकच गडद झाले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे विविध चर्चांना उधाण आले असून या घटनेमागील नेमके कारण काय, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
माहितीनुसार, 16 मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास आदिनाथ महाराज शास्त्री हे तारकेश्वर गडावर भक्तांसोबत होते. सुमारे साडेपाचच्या सुमारास ते आपल्या खोलीत गेले. काही वेळानंतर ते गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करत त्यांचे प्राण वाचवले. शस्त्रक्रियेनंतर संसर्गाचा धोका असल्याने डॉक्टरांनी त्यांना गर्दीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता.
Satara zp election : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील गोंधळावरून विधानसभेत संताप
घटनेनंतर सुरुवातीला आत्महत्येचा प्रयत्न किंवा इतर काही कारणांबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, सात दिवसांनंतर आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वतः पुढे येत या घटनेबाबत खुलासा केला. “जननेंद्रियाचा जो त्याग झाला, तो मी स्वतःहून केला असून त्यासाठी कोणत्याही व्यक्तीचा त्रास नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या विधानामुळे अनेक शंका उपस्थित झाल्या असून त्यांनी हे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, याबाबत अद्यापही स्पष्टता नाही.
दरम्यान, या घटनेमुळे त्यांच्या भक्तांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यासह बीड जिल्ह्यात आदिनाथ महाराज यांचा मोठा भक्त परिवार असून या घटनेमुळे भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. स्वतः महाराजांनीच सध्या गडावर भेट देऊ नये, असे आवाहन केल्याने या प्रकरणातील गूढ अधिकच वाढले आहे.
Ashok kharat case : तीन एफआयआर मधून समोर आली लैंगिक शोषण, अघोरी कृत्यांची भीषण मालिका
तपास यंत्रणा या प्रकरणाकडे लक्ष ठेवून असून, कोणताही दबाव किंवा अन्य कारण या घटनेमागे आहे का, याचा तपास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या महाराजांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली असली तरी या घटनेने धार्मिक व सामाजिक क्षेत्रात मोठी चर्चा रंगली आहे.








