Appointments Trigger Massive Discontent in Congress; Disgruntled Leaders to Reach Delhi on June 9 : नव्या नियुक्त्यांवरून प्रचंड असंतोष; ९ जूनला नाराज नेते दिल्लीत धडकणार
Nagpur विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महाराष्ट्र काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सोपवण्यात आली. मात्र, सपकाळ यांनी संघटनात्मक बदलांचा सपाटा लावताच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद आणि असंतोषाचा मोठा ज्वालामुखी उफाळून आला आहे. ‘सृजन संघटन अभियान’ अंतर्गत नव्याने करण्यात आलेल्या शहर आणि ग्रामीण अध्यक्षांच्या नियुक्त्यांवरून पक्षात उभी फूट पडल्याचे चित्र असून, संतप्त नेते आता थेट हायकमांड कडे धाव घेणार आहेत. आगामी ९ जून रोजी नाराज नेत्यांची मोठी फळी दिल्लीत धडकणार असल्याने काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.
विधानसभा निवडणुकीत पत्कराव्या लागलेल्या पराभवानंतर पक्षाने नाना पटोले यांचा राजीनामा घेऊन सपकाळ यांच्याकडे नेतृत्व सोपवले होते. अलीकडच्या काळात त्यांनी आक्रमक भूमिका घेत पंतप्रधान मोदींपासून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सर्वांनाच अंगावर घेण्यास सुरुवात केली खरी, मात्र पक्षांतर्गत संघटन बांधणीत ते सपशेल अपयशी ठरत असल्याचा आरोप नाराज गटाने केला आहे. जनाधार आणि कार्यकर्त्यांची भावना डावलून सपकाळ हे एका विशिष्ट गटालाच पुढे रेटत असल्याचा गंभीर आरोप आता उघडपणे होऊ लागला आहे.
महाराष्ट्र आणि विदर्भात असोंतोष उफाळून आला आहे. नागपूरमध्ये खंबीर नेतृत्व असलेले आमदार विकास ठाकरे यांना हटवून राष्ट्रीय सचिव प्रफुल गुडधे यांच्याकडे अध्यक्षपद सोपवण्यात आले. यामुळे ठाकरे गट प्रचंड संतप्त असून, त्यांनी काँग्रेसच्या अधिकृत कार्यक्रमांवर आता ‘अघोषित बहिष्कार’ टाकण्यास सुरुवात केली आहे. हीच परिस्थिती भंडाऱ्यातही पाहायला मिळत असून, तिथे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कट्टर समर्थकाला डावलून दुसऱ्याच गटाच्या नेत्याला अध्यक्षपद बहाल करण्यात आले आहे. केवळ विदर्भच नव्हे, तर पुणे, नांदेड, अकोला आणि जळगाव या प्रमुख शहरांमध्येही नव्या अध्यक्षांच्या नावावरून पक्षात तीव्र नाराजी असून कार्यकर्ते आणि स्थानिक नेते आमनेसामने आले आहेत. कार्यकर्त्यांची भावना आणि नेत्यांचा जनाधार पायदळी तुडवून जर निर्णय घेतले जात असतील, तर पक्ष वाढणार कसा, असा संतप्त सवाल आता स्थानिक पातळीवरून विचारला जात आहे.
प्रदेशाध्यक्षांच्या या एकतर्फी आणि तडकाफडकी जिल्हाध्यक्ष बदलाच्या मोहिमेमुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये तीव्र संताप आहे. या संतापाला वाचा फोडण्यासाठी आणि सपकाळ यांच्या कार्यपद्धतीची तक्रार करण्यासाठी राज्यातील असंतुष्ट नेत्यांनी मोठी लॉबिंग सुरू केली आहे. ९ जून रोजी हे सर्व नेते दिल्लीत ठाण मांडणार असून, केंद्रीय नेतृत्वासमोर सपकाळ यांच्या विरोधात तक्रार सादर केली जाण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे भाजप आणि महायुतीशी लढण्याचे आव्हान असताना, दुसरीकडे प्रदेशाध्यक्षांच्या ‘सृजन’ अभियानाने काँग्रेसमध्येच मोठ्या संघर्षाची ठिणगी टाकली आहे. आता ९ जूनच्या दिल्लीवारीनंतर हायकमांड हर्षवर्धन सपकाळ यांचे कान टोचणार की नाराज नेत्यांची समजूत काढणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








