Ashok kharat case : खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे; अमानुष अत्याचारांची माहिती सभागृहात

devendra-fadnavis-ashok-kharat-case-shocking-revelations-maharashtra-assembly : दोषींना सोडणार नाही – मुख्यमंत्री फडणवीस

Mumbai: मुंबईत सुरू असलेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक खरात प्रकरणाबाबत सभागृहात दिलेल्या माहितीनंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील तपशील अत्यंत गंभीर आणि धक्कादायक असल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, ज्या ज्या व्यक्तींच्या विरोधात पुरावे मिळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि कुणालाही सोडले जाणार नाही.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरातने स्वतःला दैवी अवतार असल्याचे भासवत महिलांचे शारीरिक आणि मानसिक शोषण केले. पीडित महिलांना धमक्या देत, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा गैरफायदा घेत अत्याचार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात महिलांना गुंगीचे औषध देणे, ब्लॅकमेल करणे आणि भीतीचे वातावरण निर्माण करून वारंवार अत्याचार केल्याचेही उघड झाले आहे.

Eknath shinde : विधान परिषदेत अनपेक्षित सूर; एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा

या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत आठ गुन्हे दाखल करण्यात आले असून तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. पीडित महिलांचे समुपदेशन करून त्यांच्याकडून तक्रारी नोंदवून घेतल्या जात आहेत, तसेच त्यांच्या ओळखी गोपनीय ठेवण्यावर भर दिला जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावरून संबंधित फोटो आणि व्हिडिओ हटवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात पुरावेही जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये रोकड रक्कम, लॅपटॉप, डीव्हीआर, शस्त्रास्त्रे आणि काडतुसे यांचा समावेश आहे. तसेच आरोपीची सुमारे ४० कोटी रुपयांची मालमत्ता उघडकीस आली असून ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात ३३ एकर जमीन, फार्महाऊस, पनवेल आणि पुण्यातील मालमत्ता तसेच सिन्नर येथील मंगल कार्यालयाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

Sindkhedraja grampanchayat : खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत बंडाची ठिणगी; सरपंचांविरोधात अविश्वास प्रस्ताव

या प्रकरणात आणखी काही पीडित महिलांची ओळख पटवण्यात आली असून त्यांचे जबाब नोंदवले जात आहेत. आरोपीच्या संबंधित संस्थेची आणि नातेवाईकांच्या नावावर असलेल्या मालमत्तेचीही चौकशी सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. याशिवाय आरोपीसोबत संबंधित असलेल्या इतर व्यक्तींचीही कसून चौकशी केली जात आहे.

या प्रकरणातील गंभीरता लक्षात घेता सरकारने कठोर भूमिका घेतली असून संपूर्ण तपास पारदर्शक पद्धतीने करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या खुलाशांमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी अधिक तीव्र होत आहे.

___