Malkapur Municipal council : दुसऱ्याच सभेत २२५ ठराव, विकासकामांचा वर्षाव की देखावा?

225 resolutions in just the second meeting of the Municipal Council : मुख्याधिकाऱ्यांच्या टिपणीनंतर प्रश्नचिन्ह; आश्वासनांच्या राजकारणाची पुन्हा चर्चा

Malkapur नगर परिषदेच्या दुसऱ्याच सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी विकासकामांचा अक्षरशः पाऊस पाडत २२५ ठराव मांडले, त्यापैकी तब्बल १७५ ठराव हे विविध विकासकामांसाठी दिलेल्या मेमोवर आधारित असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र या सर्व कामांसाठी नगर परिषदेच्या निधीऐवजी इतर योजनांमधून निधी उभारण्याची टिपणी मुख्याधिकाऱ्यांनी नोंदविल्याने नगरसेवकांची चांगलीच कोंडी झाली आहे.

निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या दबावाखाली नगरसेवकांनी प्रभागनिहाय चौक सुशोभीकरण, रस्ते, नाली, पाईपलाईन, हायमास्ट लाईट, संरक्षण भिंती, पुतळे उभारणी अशा विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणावर मेमो सादर केले. परंतु प्रत्यक्षात नगर परिषदेची आर्थिक स्थिती मर्यादित असल्याने ही कामे आमदार निधी, खासदार निधी, विविध शासकीय योजना आणि वित्त आयोगाच्या निधीतून करण्याचे सूतोवाच प्रशासनाकडून करण्यात आले.

SIR : ‘एसआयआर’साठी राजकीय हालचाली; मतदार याद्यांवर नजर

यामुळे “मेमो देणे सोपे, पण निधी कुठून आणायचा?” हा प्रश्न आता नगरसेवकांसमोर उभा ठाकला आहे. निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासने आणि प्रत्यक्षातील आर्थिक वास्तव यामधील दरी स्पष्टपणे समोर आली आहे. विशेष म्हणजे, केवळ पाच महिन्यांतच १७५ विकासकामांचे प्रस्ताव पुढे आले असताना उर्वरित साडेचार वर्षांत हा आकडा किती वाढेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.