Flood livestock compensation : अतिवृष्टीग्रस्त पशुपालकांना दिलासा : मदतीच्या नियमांमध्ये बदल

maharashtra-flood-livestock-compensation-rule-change-all-animals-eligible : सर्व मृत व बेपत्ता जनावरांसाठी आर्थिक सहाय्य जाहीर

Mumbai : राज्यातील अतिवृष्टीग्रस्त पशुपालक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला असून मदतीच्या निकषांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी आता पूर्वीपेक्षा अधिक व्यापक आणि सुलभ स्वरूपात मदत दिली जाणार आहे.

याअंतर्गत पशुपालकांना देण्यात येणाऱ्या मदतीवरील मर्यादा शिथिल करण्यात आली असून आता पुरात मृत किंवा बेपत्ता झालेल्या सर्व जनावरांसाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे. यापूर्वी केवळ ठरावीक संख्येपर्यंतच मदत दिली जात होती, मात्र आता ही मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे अनेक पशुपालक जे यापूर्वी मदतीपासून वंचित राहिले होते, त्यांनाही या नव्या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

SIR : ‘एसआयआर’साठी राजकीय हालचाली; मतदार याद्यांवर नजर

राज्य सरकारने पात्रतेच्या अटींमध्येही बदल करत अल्प व अत्यल्प भूधारक किंवा भूमिहीन पशुपालकांपुरती मर्यादा हटवून सर्व आपदग्रस्त पशुपालकांना मदतीसाठी पात्र ठरवले आहे. दुधाळ जनावरे, ओढकाम करणारी जनावरे तसेच लहान जनावरांसाठी असलेली संख्या मर्यादा रद्द करण्यात आली असून मृत किंवा बेपत्ता झालेली सर्व जनावरे मदतीसाठी पात्र असतील. कुक्कुटपालन क्षेत्रातही मोठा दिलासा देत पूर्वी असलेली मर्यादा हटवून सर्व कुक्कुटपक्ष्यांना मदतीचा लाभ मिळणार आहे.

Fuel crisis : ऐकावे ते नवलच! 200 लिटरच्या टाकीत डिझेल भरून आणले!

नुकसानभरपाईच्या रकमेतही स्पष्टता देण्यात आली आहे. गोठ्याच्या पडझडीसाठी प्रति गोठा ३ हजार रुपये दिले जाणार आहेत. मृत दुधाळ जनावरांसाठी प्रति जनावर ३७ हजार ५०० रुपये, ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी ३२ हजार रुपये आणि लहान जनावरांसाठी २० हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. शेळी व मेंढीसाठी प्रति जनावर ४ हजार रुपये दिले जाणार असून कुक्कुटपालन करणाऱ्यांना प्रति कोंबडी १०० रुपये मदत मिळणार आहे.

या निर्णयामुळे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान सहन करणाऱ्या पशुपालकांना मोठा आधार मिळणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
___