Property transactions gain pace in Buldhana, but the question of revenue growth persists : घर-भूखंड खरेदीदारांना दिलासा; दर ‘जैसे थे’, पण शासनाच्या उत्पन्नाला फटका?
Buldhana राज्य शासनाने २०२६-२७ साठी रेडीरेकनर दर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेतल्याने बुलढाणा जिल्ह्यातील मालमत्ता बाजाराला नवसंजीवनी मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या वर्षी पालिका क्षेत्रात ४.९७ टक्के आणि ग्रामीण भागात ३.३६ टक्के वाढ झाल्यानंतर यंदा दर स्थिर राहिल्याने घर, प्लॉट आणि शेतीजमिनीच्या व्यवहारांना वेग मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र दुसरीकडे महसूल वाढ आणि शहरी विकासाच्या गतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मागील वर्षी दरवाढीच्या शक्यतेमुळे मार्चअखेर खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये मोठी चढाओढ दिसून आली होती. यंदा मात्र दरवाढ टळल्याने खरेदीदारांना थेट दिलासा मिळाला आहे. किमान नोंदणी मूल्य वाढत नसल्याने विशेषतः बुलढाणा शहर, उपनगर आणि ग्रामीण भागातील प्लॉट व्यवहार अधिक सुलभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र या निर्णयाची दुसरी बाजू तितकीच महत्त्वाची ठरत आहे. जांभरूण, सागवन, येळगाव, माळविहीर, सुंदरखेड, देऊळघाट, धाड, रायपूर, पिंपळगाव सराई आणि सैलानी यांसारख्या वाढत्या व्यवहारांच्या गावांचा प्रभाव क्षेत्रात समावेश न झाल्याने “स्वस्त व्यवहार; पण मर्यादित महसूल” अशी स्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यास २०२५-२६ साठी २८५ कोटी रुपयांचे मुद्रांक महसूल उद्दिष्ट देण्यात आले असताना आतापर्यंत सुमारे २०५ कोटींचीच वसुली झाल्याची माहिती समोर येत आहे. दर वाढले नाहीत तर महसूल वाढीचा वेगही मर्यादित राहणार, हे स्पष्ट होत आहे. यामुळे विकासकामांसाठी निधी उभारणीवरही अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो.
LPG crisis : गॅस सिलिंडरच्या लाईनमध्ये उभे असताना मृत्यूची अफवा खोटी
बुलढाणा जिल्ह्याच्या अर्थकारणात गेल्या वर्षभरात सुमारे १० हजार कोटींची भर पडून एकूण आर्थिक आकार ५३ हजार कोटींवर पोहोचल्याचा अंदाज आहे. यामध्ये रिअल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्राचा सुमारे ९ हजार कोटींचा, म्हणजेच १७ टक्के वाटा आहे. त्यामुळे व्यवहार वाढणे हे स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक असले, तरी शासनाच्या महसुली गणितात मात्र तूट राहण्याची शक्यता आहे.एकूणच, दर स्थिर राहिल्याने खरेदीदारांना दिलासा आणि बाजाराला गती मिळणार असली, तरी महसूल व नियोजित शहरी विस्तारासाठी पुढील धोरणात्मक निर्णय महत्त्वाचे ठरणार आहेत.








