congress leader resigns from state executive body : कामात स्वारस्य नसल्याचे दिले कारण, प्रदेश कार्यकारीणीला रामराम
Amravati महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला धक्का देणारी घडामोड समोर आली असून, सरचिटणीस ॲड. दिलीप एडतकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हे पद केवळ नाममात्र असल्याने त्यात काम करण्यास स्वारस्य नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे. बुधवारी त्यांनी आपला राजीनामा सादर केला.
एकीकडे काँग्रेसला लागलेली गळती रोखण्याचा प्रयत्न होत असताना अंतर्गत राजकारणामुळे महत्त्वाची नेते मंडळी पदाचा राजीनामा देत आहेत. एडतकर यांनी पक्ष सोडलेला नसला तरीही त्यांनी महत्त्वाच्या पदाचा राजीनामा देत अप्रत्यक्षपणे पक्षावरची नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी पद नाममात्र असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांचा रोख प्रदेशाध्यक्षांकडे आहे, की आणखी कुणाकडे, याबबात तर्कवितर्क लावले जात आहेत.
सुमारे वर्षभरापूर्वी ॲड. एडतकर यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष कामकाजात या पदाला अपेक्षित महत्त्व नसल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे या पदावर पुढे काम करण्यास त्यांनी नकार दर्शवला आहे.
ladki bahin yojana : ६८ लाख महिला अपात्र ठरल्याने सरकारचा १२,२४० कोटींचा भार कमी !
एडतकर यांनी आपले राजीनामा पत्र काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर तसेच माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांना ई-मेलद्वारे पाठवले आहे.
दरम्यान, व्यवसायाने पत्रकार असलेल्या एडतकर यांच्याकडे काँग्रेसने प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारीही दिली होती. त्यांच्या राजीनाम्यामागील नेमके इतर कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी या निर्णयामुळे पक्षात चर्चांना उधाण आले असून काँग्रेससाठी हा धक्का मानला जात आहे.








