ashok-kharat-case-kalpana-kharat-lookout-notice-sit-investigation-70-crore-property-scam : इतरांच्या नावावर ठेवलेल्या ७० कोटींच्या बेनामी संपत्तीचा तपास तीव्र
Nashik: नाशिकमधील भोंदूबाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणात तपास अधिकच वेगाने पुढे जात असून या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात अद्यापही तपास यंत्रणांच्या हाती लागलेली नसल्यामुळे तिच्याविरोधात लूकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. दोन दिवसांहून अधिक काळ लोटल्यानंतरही ती सापडत नसल्याने विशेष तपास पथकाने तिचा शोध अधिक तीव्र केला आहे.
कल्पना खरात फरार असल्यामुळे एसआयटीने आता तिच्या नातलगांवर लक्ष केंद्रित केले आहे. अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन याची पुन्हा चौकशी करण्यात आली असून कल्पनाच्या दोन भावांचीही कसून चौकशी करण्यात आली आहे. तपास यंत्रणा कल्पनाच्या हालचालींचा मागोवा घेत असून तिच्या संपर्कातील सर्व व्यक्तींची माहिती गोळा केली जात आहे.
दरम्यान, एसआयटीचे पथक सिन्नर तालुक्यातील पाडळी येथील कल्पनाच्या माहेरी पोहोचले असता धक्कादायक माहिती समोर आली. कल्पना खरात गेल्या १६ वर्षांपासून माहेराशी संपर्कात नसल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले. विवाहानंतर तिने माहेराशी संबंध जवळपास तोडले होते आणि अशोक खरात तिला माहेरी येऊ देत नव्हता, अशी माहितीही समोर आली आहे. तिच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह अत्यंत मर्यादित शेतीवर चालत असल्याचेही तपासातून उघड झाले आहे.
Navneet Rana : ठाकरेंपुढे ‘हनुमान चालीसा’ पठणाशिवाय पर्याय नाही, नाहीतर शिल्लक सेनेवरही ‘गदा’!
याच प्रकरणात शिर्डी परिसरातील एका शेतकऱ्याची जमीन खरेदीच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोपही समोर आला आहे. या व्यवहारात कल्पना खरात, तिचे भाऊ आणि अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन यांचा सहभाग असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे जोडताना या प्रकरणात नातलगांची भूमिका अधिक स्पष्ट होत असून एसआयटीकडून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.
अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित शिवनिका संस्थानच्या तीन संचालकांचीही एसआयटीने चौकशी केली आहे. इशान्येश्वर मंदिराशी संबंधित या संस्थेच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केल्याचा संशय असून लाखो रुपयांची फसवणूक आणि महिलांचे शोषण केल्याचे आरोप तपासात समोर आले आहेत. या संचालकांचा खरातसोबत आर्थिक भागीदारी असल्याचे प्राथमिक पुरावे मिळाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
तपासादरम्यान आणखी एक मोठा खुलासा समोर आला असून विविध पतसंस्थांमध्ये शंभरहून अधिक खात्यांवर अशोक खरात हा नॉमिनी असल्याचे आढळले आहे. कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेत ५७ खातेदारांनी १०० खाती उघडली असून त्यावर सुमारे ६० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती आहे. या सर्व खात्यांशी अशोक खरातचा मोबाईल क्रमांक जोडलेला असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
Ncp controversy : राष्ट्रवादीत अंतर्गत वादाला उधाण; पार्थ पवारांचे स्पष्टीकरण !
तसेच नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांमध्ये अशोक खरातने मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी केल्याचे उघड झाले आहे. केवळ चार वर्षांत सुमारे ७० कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता जमा केल्याचा संशय असून बहुतेक व्यवहार रोख रकमेने करण्यात आले आहेत. कोणताही अधिकृत हिशोब नसल्यामुळे तपास अधिक गुंतागुंतीचा होत आहे. मोबाईलमधील डेटा जप्त करण्यात आला असून त्यातून महत्त्वाचे पुरावे मिळत असल्याची माहिती आहे.
सध्या अशोक खरात न्यायालयीन आदेशानुसार ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत असून एसआयटीकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतशी नवनवीन माहिती समोर येत असून या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








