maharashtra-unseasonal-rain-yellow-alert-16-districts-crop-damage : गारपीट, वादळी वाऱ्यांसह १६ जिल्ह्यांना यलो अलर्ट
Mumbai: महाराष्ट्रात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने पुन्हा जोर धरला असून गारपीट, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. बळीराजाच्या तोंडचा घास हिरावणाऱ्या या अस्मानी संकटामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील ४८ तास राज्यात अशाच स्वरूपाचे हवामान राहण्याची शक्यता असून १६ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज ४ एप्रिल रोजी राज्यातील बहुतांश भागांत वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही भागांत गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांसह मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांवर अवकाळीचे सावट कायम आहे.
भंडारा जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. काही भागांत जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मागील दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे मका, भाजीपाला आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. काही भागांत वीज पुरवठाही खंडित झाला होता.
नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. दोन दिवसांत ६२ गावांतील ९५४ शेतकरी बाधित झाले असून सुमारे ८३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. कांदा, मका, ज्वारी, बाजरी, गहू, केळी, पपई आणि आंबा या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू असून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
वाशिम शहरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील एक जुने झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून झाड हटवून रस्ता मोकळा केला.
सोलापूर शहरातही अचानक वातावरण बदलून संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तर सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात गारपीट आणि वादळी पावसामुळे मका, डाळिंब आणि कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीच्या अवस्थेतील पिके पूर्णपणे वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. द्राक्ष, आंबा आणि डाळिंब फळबागांनाही मोठा फटका बसला असून फुलांची आणि फळांची गळती वाढली आहे.
Buldhana politics : ‘आकांचा कॉल आला की काम पक्कं’, बुलढाण्यात नवा ट्रेंड!
वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांत झाडांची पडझड झाली असून वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. रस्त्यांवर झाडांच्या फांद्या पडल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. सततच्या अवकाळी पावसामुळे शेतीचे नियोजन विस्कळीत झाले असून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
पुढील दोन दिवस राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार असून नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.








