Defamation of Revenue Minister Bawankule on Facebook; Case registered in Koradi : ११४७ एकर जमिनीचा ‘फेक’ दावा अंगलट, पोलिसांची करडी नजर
Nagpur भाजप नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची सोशल मीडियावरून बदनामी करणाऱ्या एका व्यक्तीला आता कायद्याचा हिसका बसला आहे. बावनकुळे कुटुंबाकडे तब्बल १,१४७ एकर जमीन असल्याचा खोटा आणि दिशाभूल करणारा दावा करणे रामेश्वर दरेकर याला चांगलेच भोवले असून, त्याच्या विरोधात कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निखिल रामचंद्र इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. संशयित आरोपी रामेश्वर दरेकर याने फेसबुकवर एक व्हिडिओ प्रसारित केला होता. या व्हिडिओमध्ये महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर १,१४७ एकर जमीन असून ते कोट्यवधींचे मालक असल्याचा दावा करण्यात आला होता. ३१ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला, ज्यामुळे बावनकुळे कुटुंबाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला.
या खोट्या दाव्यानंतर कामठी तहसील कार्यालयाकडून अधिकृत प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे. या सरकारी दस्तऐवजानुसार, चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर विविध गावांतील सर्वे क्रमांक मिळून एकूण केवळ २८.४४ एकर जमीन आहे.
फेसबुकवर करण्यात आलेला १,१४७ एकरचा दावा पूर्णपणे निराधार आणि जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने केल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोराडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून सखोल तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ यांच्याकडे या तपासाची सूत्रे सोपवण्यात आली असून, सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे.








