Nagpur congress to get new city president: समर्थकाची वर्णी लावण्यासाठी दिग्गज नेत्यांची जोरदार ‘फिल्डिंग’
Nagpur नागपूर शहर काँग्रेसचा नवा ‘शिल्पकार’ कोण होणार? या चर्चेने सध्या शहराच्या राजकीय वर्तुळात चांगलाच जोर धरला आहे. शहराध्यक्ष पदासाठी सर्वच गट सक्रिय झाले असून, आपल्या समर्थकाची वर्णी लागावी यासाठी दिग्गज नेत्यांनी जोरदार ‘फिल्डिंग’ लावली आहे. या पार्श्वभूमीवर, इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी पक्षाने नियुक्त केलेले केंद्रीय पर्यवेक्षक अरुण यादव नागपुरात दाखल झाले असून, आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
गेल्या १२ वर्षांपासून विकास ठाकरे नागपूर शहराध्यक्ष पदाची धुरा सांभाळत आहेत. त्यांनी दोन वेळा विधानसभा निवडणूक जिंकली असल्याने, संघटनेसाठी कोण उपयुक्त ठरेल याची त्यांना पूर्ण कल्पना आहे, असे संकेत अरुण यादव यांनी दिले. यादव यांच्या विधानावरून, आगामी अध्यक्ष हा विकास ठाकरे यांच्या पसंतीचाच असेल, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.
Vijay Wadettiwar : अख्खा सातबारा कोरा करा, दोन लाखांनी काय होणार? काँग्रेस नेत्याचा सवाल
काँग्रेसने पक्ष संघटनेत फेरबदल करण्यासाठी ‘सृजन’ अभियान हाती घेतले आहे. गुजरातपासून सुरू झालेले हे अभियान आतापर्यंत डझनभर राज्यांत राबवण्यात आले असून, नागपुरात शनिवारपासून याचा प्रारंभ होत आहे. मध्य प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अरुण यादव यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ते विधानसभानिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सामूहिक आणि ‘वन टू वन’ चर्चा करणार आहेत. त्यानंतर इच्छुक उमेदवारांच्या वैयक्तिक मुलाखती घेतल्या जातील. सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर यादव आपला अहवाल हायकमांडला सोपवतील आणि त्यानंतरच नव्या अध्यक्षाची घोषणा होईल. संघटन मजबूत करणे आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
Vikas Thakre : विकास ठाकरेंची ‘इनिंग’ संपणार? शहर काँग्रेसच्या नव्या ‘कॅप्टन’साठी निरीक्षक नागपुरात!
या पत्रकार परिषदेत अरुण यादव यांनी भाजपवरही सडकून टीका केली. मध्य प्रदेशातील भाजप सरकारचा उल्लेख त्यांनी ‘माफिया सरकार’ असा केला. गेल्या १८ वर्षांपासून मध्य प्रदेशात भूमाफिया आणि खाण माफियांनी धुमाकूळ घातला आहे. भाजपशासित राज्यांमध्ये शेतकऱ्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे. केंद्राने गव्हाला २७०० रुपये हमीभाव जाहीर केला, पण अद्याप खरेदी सुरू झालेली नाही. परिणामी शेतकऱ्यांना ८० टक्के गहू कमी दरात विकावा लागला,” असा गंभीर आरोप यादव यांनी केला. आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ही मोर्चेबांधणी केली जात आहे. विशेष म्हणजे, या पत्रकार परिषदेला अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले आमदार अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, प्रशांत धवड, कमलेश समर्थ, संजय दुबे आणि उमाकांत अग्नीहोत्री, संदेश सिंगलकर, संजय महाकाळकर, नौश आली हे नेते प्रामुख्याने उपस्थित होते.








