व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांनी माफी मागितली नाही तर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा...

Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांनी माफी मागितली नाही तर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

Sanjay Gaikwad asked to apologise or face a ₹100 crore defamation suit : गायकवाड-शिंदे वाद शिगेला; बुलढाण्यात आरोपांच्या फैरी

Buldhana जिल्ह्यात महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील वाद वाढतच असून आता शिगेला पोहचला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. बुलढाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत १५ दिवसांत जाहीर माफी न मागितल्यास १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करू, असा थेट इशारा शिंदे यांनी दिला. आदिवासी विद्यार्थिनी, महिला कर्मचारी आणि स्वतःबाबत लांच्छनास्पद वक्तव्ये केल्याचा आरोप करत त्यांनी हा कायदेशीर इशारा दिला.

शिंदे यांनी सांगितले की, त्यांच्या आश्रमशाळेतील सुमारे ३०० आदिवासी विद्यार्थिनी आणि ३० ते ३५ महिला कर्मचाऱ्यांबाबत आमदार गायकवाड यांनी केलेली वक्तव्ये बेताल, मानहानीकारक आणि समाजमन अस्वस्थ करणारी आहेत. या वक्तव्यांमुळे संबंधित मुली व महिलांच्या सन्मानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा दावा करत त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांसह स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच, संबंधितांविरोधात अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली.

Akola Congress : अकोला जिल्हा काँग्रेसला मिळणार का सक्षम नेतृत्व?

याचवेळी, चिखली येथील सभेत गायकवाड यांनी केलेल्या ‘भाजप कार्यकर्त्यांना १५० कोटींची कामे दिली’ या दाव्यावरही शिंदे यांनी जोरदार प्रतिआव्हान दिले. कोणत्या कार्यकर्त्याला, कोणत्या गावात आणि किती निधीची कामे देण्यात आली, याची सविस्तर यादी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली. याशिवाय, आमदारांचे कार्यालय नगरपालिकेच्या जागेवर आणि जनतेच्या पैशातून उभारण्यात आल्याचा आरोप करत ३५ कोटींच्या कथित कमिशनप्रकरणी लाभार्थ्यांची नावे जाहीर करावीत, अशीही मागणी त्यांनी केली.

Akash Fundkar : सलग खुनांच्या घटनांनी हादरले अकोला; पालकमंत्री फिरकून बघेना

दरम्यान, या इशाऱ्याला प्रत्युत्तर देताना आमदार संजय गायकवाड यांनीही तितक्याच आक्रमक पध्दतीने भूमिका मांडली. “शिंदे यांनी १०० नव्हे, १००० कोटींचा दावा केला तरी मी माफी मागणार नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी प्रतिआक्रमण केले. पत्रकार परिषदेत बोलताना गायकवाड यांनी शिंदे यांच्या आश्रमशाळेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. अल्पवयीन मुलींच्या शोषणाचा आरोप करत एका मुलीच्या गर्भधारणेच्या प्रकरणासह विद्यार्थ्यांच्या मृत्यूचाही उल्लेख त्यांनी केला. या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
याशिवाय, एका शासकीय समितीच्या अहवालातील काही पाने जाणीवपूर्वक गायब केल्याचा आरोप करत, संस्थेतील कथित अनैतिक प्रकारांची माहिती माहिती अधिकारातून सत्य समोर येईल, असा दावा गायकवाड यांनी केला. वैयक्तिक आणि आर्थिक बाबींवरही गंभीर प्रश्न उपस्थित करत त्यांनी राज्य नेतृत्वाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

error: Content is protected !!