mira-bhayandar-marathi-compulsory-auto-drivers-bishnoi-gang-threat-rto-officer-marathi-news : रिक्षाचालकांच्या मुद्द्यावर तणाव वाढला, प्रशासन सतर्क
Mumbai: मिरा-भाईंदर परिसरात रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असून या वादाला आता गंभीर वळण मिळाले आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईत रिक्षा चालवण्यासाठी मराठी भाषा येणे बंधनकारक करण्यात येईल, असे जाहीर केल्यानंतर मराठी विरुद्ध अमराठी वाद पुन्हा उफाळून आला होता. या पार्श्वभूमीवर आता गुन्हेगारी जगतातील लॉरेन्स बिष्णोई गँग या गटाने थेट हस्तक्षेप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिरा-भाईंदरमधील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एका मराठी अधिकाऱ्याला अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन करण्यात आला आहे. या फोनमध्ये रिक्षाचालकांवर मराठी भाषा सक्ती केल्याच्या निर्णयाविरोधात इशारा देण्यात आल्याचे समजते. या प्रकरणाची माहिती समोर येताच परिवहन विभाग आणि स्थानिक पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून संबंधित घटनेची नोंद घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Ashok kharat case : अशोक खरातसोबत राजकीय व्यक्तींचेही व्हिडीओ असल्याचा दावा
दरम्यान, या निर्णयावरून राजकीय पातळीवरही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही संघटनांनी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या भूमिकेला समर्थन दिले असले तरी अमराठी भाषिकांच्या प्रतिनिधींनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. रिक्षाचालक हा मुंबईच्या वाहतुकीचा कणा असल्याने अशा प्रकारे भाषिक अट लादताना वास्तव परिस्थितीचा विचार करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
या वादात राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित काही नेत्यांनीही भूमिका मांडत रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी पुरेसा कालावधी देण्याची मागणी केली आहे. अल्प मुदतीत भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय व्यवहार्य नसून त्यातून अनावश्यक तणाव निर्माण होऊ शकतो, असे मत मांडण्यात आले आहे. तसेच गरज भासल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
या सर्व घडामोडींमुळे मिरा-भाईंदर आणि मुंबई परिसरातील सामाजिक आणि राजकीय वातावरण अधिकच तापले असून प्रशासनासमोर कायदा व सुव्यवस्थेचे आव्हान निर्माण झाले आहे. धमकीच्या घटनेनंतर या प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले असून संबंधित यंत्रणा तपास आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलत आहेत.








