acb-action-forest-officers-bribe-arrest-50-thousand-noc-case : एसीबीची मोठी कारवाई; ना हरकत प्रमाणपत्रासाठी ५० हजार मागितले
Thane : जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत वन विभागातील दोन अधिकाऱ्यांना रंगेहात अटक केली आहे. नवीन पेट्रोलपंपासाठी आवश्यक असलेल्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. विलास सानप आणि रेखा गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे असून, या घटनेमुळे सरकारी यंत्रणेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा पुन्हा पर्दाफाश झाला आहे.
तक्रारदाराने पेट्रोलपंप सुरू करण्यासाठी वन विभागाकडे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी काम मंजूर करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचण्याचा निर्णय घेतला.
Khamgao Politics : पोस्टरवर साथ साथ, प्रत्यक्षात ‘नो बात’; शिंदेसेनेचे ‘स्माईल पॉलिटिक्स’
त्यानुसार तक्रारदार आणि आरोपींमध्ये चर्चेनंतर २५ हजार रुपयांवर व्यवहार ठरवण्यात आला. नियोजित दिवशी तक्रारदार पैसे देण्यासाठी संबंधित कार्यालयात गेले असता, एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आधीच सापळा रचला होता. पैसे स्वीकारताना विलास सानप आणि रेखा गायकवाड यांना अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या काही काळात एसीबीकडून सातत्याने कारवाया करण्यात येत असून अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तरीही सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काच्या कामासाठी लाच द्यावी लागत असल्याचे वास्तव कायम असल्याचे दिसून येत आहे.
Dilip Sananda : सानंदा–सोनोने ‘गोड’ भेटीची खामगावात चर्चा; राजकीय भेट, की नवे समिकरण
याच पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सरकारी कार्यालयांतील भ्रष्टाचारावर कठोर भूमिका घेतली आहे. लोकाभिमुख प्रशासनासाठी केवळ घोषणा नव्हे, तर प्रत्यक्ष कृती आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यांचे निरीक्षण वरिष्ठ स्तरावरून करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. या उपाययोजनांमुळे प्रशासनातील पारदर्शकता वाढेल आणि भ्रष्टाचारावर काही प्रमाणात आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
___








