Dilip Sananda, Ashok sonone came together for dr. babasaheb ambedkar jayanti program : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात दोन्ही नेते आले एकत्र
Khamgao राजकारणात कायमस्वरूपी मैत्री किंवा वैर नसते, तर परिस्थितीनुसार समीकरणे बदलत असतात, याची पुन्हा एकदा प्रचिती देणारा एक ‘गोड’ प्रसंग अलीकडे शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा आणि वंचित बहुजन आघाडीचे पार्लमेंटरी बोर्ड सदस्य अशोक सोनोने हे दोन नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात एकत्र दिसले. यावेळी सानंदा यांनी सोनोने यांना बुंदीचा लाडू भरवत ‘तोंड गोड’ केल्याने उपस्थितांमध्ये विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या काही वर्षांत स्थानिक राजकारणात सानंदा आणि सोनोने यांची वाटचाल अनेकदा वेगवेगळ्या दिशांनी होताना दिसली. काही टप्प्यांवर दोघांनी एकत्रित भूमिका घेतली, तर काहीवेळी परस्परांपासून अंतर राखल्याचे चित्र होते. बदलत्या राजकीय समीकरणांनुसार त्यांचे संबंध कधी जवळ आले, तर कधी दुरावले. मात्र वैयक्तिक स्तरावर दोघांमध्ये सलोखा कायम असल्याचे संकेत वेळोवेळी मिळत आले आहेत.
Vidarbha Farmers : मुलभूत सुविधांसाठी शेतकरी आक्रमक, बाजार समितीत आंदोलन
अशा पार्श्वभूमीवर आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांची रंगलेली भेट आणि त्यानंतरचा ‘लाडू क्षण’ हा केवळ सामाजिक सौजन्याचा भाग होता की त्यामागे आगामी राजकीय हालचालींचे संकेत दडले आहेत, याबाबत शहरात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे हा क्षण अनेक उपस्थितांनी आपल्या मोबाइलमध्ये कैद केला असून, तो व्हिडिओ आणि छायाचित्रे विविध सोशल मीडिया गटांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. स्थानिक राजकीय वर्तुळात या भेटीकडे वेगळ्याच नजरेने पाहिले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, बदलती सामाजिक समीकरणे आणि विविध पक्षांच्या नव्या आघाड्यांच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर या ‘गोड’ भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
विशेषतः वंचित बहुजन आघाडी आणि पारंपरिक राजकीय गटांमधील संभाव्य संवादाच्या शक्यतेशीही या घटनेची सांगड घातली जात आहे. सार्वजनिक कार्यक्रमांमधील अशा प्रतीकात्मक भेटी अनेकदा मोठ्या राजकीय घडामोडींची नांदी ठरतात. त्यामुळे सानंदा–सोनोने यांच्या या मैत्रीपूर्ण क्षणाकडे केवळ सामाजिक औपचारिकता म्हणून पाहणे अवघड असून, भविष्यातील स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल म्हणून त्याची चर्चा रंगत आहे.








