pune-mundhwa-land-scam-sheetal-tejwani-bail-court-observation-bavdhan-police : अटकेतील त्रुटींवर न्यायालयाचे ताशेरे, बावधन पोलिसांच्या भूमिकेवर संशय
Pune : पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात कथित ‘मास्टरमाइंड’ शीतल तेजवानी हिला न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला असून अटकेतील प्रक्रियात्मक त्रुटींवर न्यायालयाने गंभीर निरीक्षण नोंदवले आहे. बावधन पोलिसांनी अटकेपूर्वीची आवश्यक पूर्तता करताना केलेल्या कुचराईमुळेच तेजवानीला दिलासा मिळाल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
न्यायालयाने आपल्या आदेशात बावधन पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ५२३/२०२५ संदर्भातील १६ डिसेंबर २०२५ रोजीची अटक आणि त्यानंतरचे रिमांड आदेश बेकायदेशीर ठरवले आहेत. तसेच या अटकेनंतर दिलेले सर्व पुढील ताबा आणि रिमांड आदेशही अवैध असल्याचे नमूद करत अर्जदाराला मुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी पन्नास हजार रुपयांचा वैयक्तिक हमी बाँड आणि तितक्याच रकमेचा जामीनदार देण्याची अट घालण्यात आली आहे.
Nana Patole : महिला आरक्षणाच्या आडून भाजपला आणायचा होता ‘मनुवाद’; नाना पटोलेंचा घणाघात
या प्रकरणात पोलिसांनी अटक करताना कारणे स्पष्ट न करणे तसेच आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण न करणे यासारख्या त्रुटी केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. पिंपरी पोलीस ठाण्यातील दुसऱ्या गुन्ह्यातही ३ जानेवारी २०२६ रोजीची अटक आणि त्यानंतरचे रिमांड आदेश बेकायदेशीर ठरवत न्यायालयाने तत्सम निर्णय दिला आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये अटकेची प्रक्रिया कायदेशीर निकषांनुसार पार पडली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही कठोर अटी घातल्या आहेत. आरोपीने पुराव्याशी कोणतीही छेडछाड करू नये, साक्षीदारांना धमकी किंवा प्रलोभन देऊ नये, तपास अधिकाऱ्यासमोर आवश्यकतेनुसार हजर राहावे आणि न्यायालयात नियमित उपस्थिती लावावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Devendra fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडमध्ये, खरात, धर्मांतर, ड्रग प्रकरणांचा आढावा
दरम्यान, या प्रकरणात सुरुवातीपासूनच पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत होते. अटकेदरम्यान झालेल्या त्रुटी या केवळ निष्काळजीपणामुळे झाल्या की त्यामागे जाणीवपूर्वक हेतू होता, याबाबत आता चर्चा रंगू लागली आहे. या प्रक्रियात्मक चुका केवळ तांत्रिक स्वरूपाच्या नसून त्याचा थेट फायदा आरोपीला झाल्याने तपास यंत्रणांवर अधिक जबाबदारी येऊन पडली आहे.
तथापि, पुणे पोलिसांकडील इतर प्रकरणांमध्ये शीतल तेजवानीचा ताबा कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात पुढील कायदेशीर घडामोडींकडे लक्ष लागले आहे.
___






