shyam-manav-allegations-ashok-kharat-case-eknath-shinde-rupali-chakankar-connection-nashik : भोंदूबाबा प्रकरणाला वेगळाच रंग, श्याम मानव यांचा खळबळजनक आरोप
Mumbai : नाशिक येथे उघडकीस आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले असून श्याम मानव यांनी अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. या प्रकरणाचा संबंध थेट एकनाथ शिंदे आणि रुपाली चाकणकर यांच्याशी असल्याचा दावा करत त्यांनी तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या आरोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, अशोक खरात प्रकरण इतक्या मोठ्या प्रमाणावर समोर येण्यामागे राजकीय समीकरणे कारणीभूत आहेत. त्यांच्या मते, जर या भोंदू बाबाचा संबंध प्रभावशाली नेत्यांशी नसता, तर हे प्रकरण सुरुवातीलाच दडपले गेले असते. मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत काही नेत्यांना धडा शिकवण्यासाठीच पोलिसांना तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
Crime news : राळेगाव हादरले; तब्बल ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता !
श्याम मानव यांनी पुढे असा दावा केला की, अशोक खरात याच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीचे मोठे जाळे कार्यरत होते. विविध मार्गांनी लोकांची आर्थिक माहिती मिळवून बनावट आयकर अधिकाऱ्यांच्या मदतीने छापे टाकले जात आणि त्यातून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात होते. या प्रकारात काही उच्चपदस्थ अधिकारी आणि प्रभावशाली व्यक्तींचाही सहभाग असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. या सर्व घडामोडींमध्ये यापूर्वी कोणतीही ठोस कारवाई न झाल्याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
या प्रकरणात काही महिलांचे व्हिडिओ समोर आल्याचा उल्लेख करत श्याम मानव यांनी अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे शोषण होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. भीती आणि अंधविश्वासाचा फायदा घेत अशा भोंदू बाबांकडून महिलांना मानसिकरीत्या जखडले जाते, असे ते म्हणाले. समाजात अशा प्रकारांना अप्रत्यक्ष मान्यता मिळत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी अंधश्रद्धेविरोधात अधिक प्रभावी जनजागृतीची गरज अधोरेखित केली.
Grampanchayat Elections delayed : ‘नामधारी’ प्रशासक सरपंच; अधिकार गोठल्याने ग्रामविकास ठप्प
दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून विविध अंगांनी चौकशी केली जात आहे. आरोपांची सत्यता तपासली जात असून संबंधित सर्व दुव्यांचा मागोवा घेतला जात आहे. या प्रकरणात पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.








