व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Missing link project : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्णत्वाकडे

Missing link project : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्णत्वाकडे

mumbai-pune-expressway-missing-link-project-inauguration-travel-time-reduction : १ मे रोजी उद्घाटन; प्रवासाचा वेळ सुमारे ३० मिनिटांनी कमी होणार

Mumbai : राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे सुमारे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून येत्या १ मे रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या नव्या जोडमार्गामुळे मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार असून प्रवासाचा वेळ तब्बल २० ते ३० मिनिटांनी कमी होणार आहे. या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी कमी होऊन सिग्नल-फ्री प्रवासाचा अनुभव मिळणार असल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कामाच्या गुणवत्तेची खात्री करून घेतली असून उर्वरित किरकोळ कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

Farmer loan waiver : ३५ लाख शेतकऱ्यांना दिलासा? दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची शक्यता!

सुमारे १०.५ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पामध्ये दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅली परिसरात सुमारे १८२ मीटर उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. सुमारे २३.७५ मीटर रुंदीचा बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो. कठीण भौगोलिक परिस्थिती, मुसळधार पाऊस आणि ७० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणारे वारे अशा प्रतिकूल परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. लोणावळा तलावाच्या सुमारे १८२ मीटर खाली हा मार्ग जात असल्यामुळे हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक होता. मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी हे आव्हान यशस्वीरीत्या पार पाडले आहे.

‘मिसिंग लिंक’ मार्ग सुरू झाल्यानंतर घाटातील धोकादायक वळणे पूर्णपणे टाळली जाणार असून अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे इंधनाची बचत, वेळेची बचत आणि प्रदूषणात घट होणार आहे. या प्रकल्पामुळे द्रुतगती मार्गाचे अंतर सुमारे ६ किलोमीटरने कमी होणार असून सुरुवातीच्या टप्प्यात हलकी वाहने आणि बस यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा धक्का; अपात्र लाभार्थींवर थेट कारवाई!

सुमारे ६७०० कोटी रुपयांच्या खर्चाच्या या प्रकल्पाला २०१९ साली मंजुरी देण्यात आली होती. त्या वेळीही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि आता त्यांच्या उपस्थितीतच या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा देशातील पहिला ऍक्सेस कंट्रोल मार्ग असून या मार्गामुळे आयटी, सेवा, उद्योग आणि रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. आता ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे या मार्गाची कार्यक्षमता आणखी वाढणार आहे.

या प्रकल्पामुळे लोहगड किल्ला, विसापूर किल्ला आणि कार्ला लेणी यांसारख्या पर्यटन स्थळांना अधिक चांगली जोडणी मिळणार असून पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळणार आहे. बोगद्यांमध्ये या ऐतिहासिक स्थळांच्या प्रतीकृतींवर आधारित सजावट करण्यात आली असून त्याचा दर्जा कायम राखण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे.

Chandrashekhar bawankule: बावनकुळेंशी पंगा घेत प्रा. राजकुमार घुले यांचा ‘धनुष्यबाण’ हाती घेण्याचा निर्धार

राज्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पुढील काळात समृद्धी महामार्ग, कोकण कोस्टल रोड आणि वसई-विरार मल्टीमोडल कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पांना जोडून ऍक्सेस कंट्रोल रस्त्यांचे जाळे उभारण्यावर सरकारचा भर असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील कोणत्याही भागातून दुसऱ्या भागात ७ ते ८ तासांत पोहोचता येईल, अशी आधुनिक आणि वेगवान वाहतूक व्यवस्था उभारण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

या पाहणी दौऱ्यात खासदार श्रीरंग बारणे, माजी नगरसेवक आबासाहेब बागुल, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड तसेच संबंधित कंपन्यांचे अभियंते आणि कर्मचारी उपस्थित होते.

___

error: Content is protected !!