व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Vidhan parishad election : साडेचार वर्षांनंतर विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी

Vidhan parishad election : साडेचार वर्षांनंतर विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी

maharashtra-vidhan-parishad-local-authority-election-2026-17-seats-june-schedule : जूनमध्ये १७ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांसाठी मतदानाची शक्यता

Mumbai : राज्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुका गेल्या साडेचार वर्षांपासून रखडल्या होत्या. मात्र आता या निवडणुकांची प्रतीक्षा संपण्याची शक्यता असून येत्या जून महिन्यात १६ नियमित जागांसह नागपूर पोटनिवडणूक मिळून एकूण १७ जागांसाठी मतदान होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील महायुती आणि महाआघाडी यांच्यात पुन्हा थेट सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

कोरोना महामारी आणि इतर मागासवर्गीय आरक्षणाच्या प्रश्नामुळे राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे संबंधित मतदारसंघांतील मतदारसंख्या अपुरी असल्याने भारत निवडणूक आयोगाला विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर करता येत नव्हत्या. मात्र गेल्या काही महिन्यांत महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडल्यामुळे आता बहुतांश मतदारसंघांमध्ये आवश्यक असलेली ७५ टक्के मतदारसंख्या पूर्ण झाली आहे.

Vidhan parishad election : नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांच्या नावांना शिवसेनेतूनच जोरदार विरोध !

या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकांबाबतचा प्रस्ताव भारत निवडणूक आयोग यांच्याकडे पाठवला आहे. येत्या १२ मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या विद्यमान ९ जागांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच या १७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणुकीचा कार्यक्रम मे महिन्यात जाहीर होऊन प्रत्यक्ष मतदान जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. संबंधित १७ मतदारसंघांची यादी तसेच मतदारसंख्या आयोगाकडे सादर करण्यात आली आहे. काही मतदारसंघांमध्ये जिल्हा परिषद सदस्य नसले तरी एकूण मतदारसंख्या ७५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे निवडणूक घेण्यात कोणतीही अडचण येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Iran america conflict : होर्मुज तणाव शिगेला, इराण-अमेरिका संघर्षात जागतिक ऊर्जा संकट

विधान परिषदेच्या अनेक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांची मुदत २०२२ पासूनच संपलेली आहे. अहमदनगर आणि सोलापूरसारख्या मतदारसंघांची मुदत १ जानेवारी २०२२ रोजी संपली होती, तर काही मतदारसंघांची मुदत २०२४ मध्ये पूर्ण झाली आहे. त्यामुळे या निवडणुकांची उत्सुकता इच्छुक उमेदवारांमध्ये वाढली असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळवण्यासाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात पोटनिवडणूकही होणार आहे. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे २०२२ मध्ये या मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र २०२४ मध्ये ते विधानसभेवर निवडून आल्याने ही जागा रिक्त झाली आहे. या जागेची मुदत १ जानेवारी २०२८ पर्यंत असल्यामुळे येथे पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.

Missing link project : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्णत्वाकडे

या निवडणुकीत सोलापूर, अहमदनगर, ठाणे-पालघर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, औरंगाबाद-जालना तसेच नागपूर या मतदारसंघांचा समावेश असणार आहे.

साडेचार वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे असून स्थानिक पातळीवरील राजकारणालाही यामुळे नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

___

error: Content is protected !!