व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Ashok kharat case : समता पतसंस्था गैरव्यवहार प्रकरण तापलं; प्रतिभा चाकणकरांना ईडीचे...

Ashok kharat case : समता पतसंस्था गैरव्यवहार प्रकरण तापलं; प्रतिभा चाकणकरांना ईडीचे समन्स !

pratibha-chakankar-ed-summons-ashok-kharat-samata-patsanstha-financial-irregularities : अशोक खरात कनेक्शनची होणार सखोल चौकशी

Mumbai : नाशिकच्या कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने मोठी कारवाई सुरू केली असून राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित चाकणकर कुटुंबाच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. समता पतसंस्थेतील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासात ईडीने प्रतिभा चाकणकर यांना समन्स बजावत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणात आता आर्थिक व्यवहारांचा तपास अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नाशिकमधील अशोक खरात या कथित भोंदूबाबावर महिलांचे लैंगिक शोषण, जादूटोणा आणि आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप आहेत. अनेक महिलांनी त्याच्याविरोधात तक्रारी दाखल केल्यानंतर पोलीस आणि तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू केला. तपासादरम्यान खरात याचे विविध राजकीय व्यक्तींशी संबंध असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली होती.

Bachchu kadu : मी भाजपसोबत ‘मॅच’ होऊ शकत नाही; बच्चू कडूंची स्पष्ट भूमिका

या प्रकरणाचा धुरळा उडाल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावरही राजकीय दबाव वाढला होता. अखेर त्यांना महिला प्रदेशाध्यक्षपद आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू झाली आणि त्यामध्ये प्रतिभा चाकणकर यांचे नाव पुढे आले.

पोलीस तपासात राहाता येथील समता पतसंस्थेमध्ये प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या पुतण्याच्या नावाने असलेल्या चार खात्यांमधून तब्बल दोन कोटी चाळीस लाख रुपयांची उलाढाल झाल्याचे समोर आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली होती. विशेष म्हणजे या खात्यांमध्ये अशोक खरात हा नॉमिनी असल्याचेही तपासात स्पष्ट झाले. या संशयास्पद आर्थिक व्यवहारांच्या तपासासाठीच आता ईडीने प्रतिभा चाकणकर यांना मुंबईतील झोन २ कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवले आहेत.

या चौकशीतून आर्थिक व्यवहारांचे स्वरूप, पैशांचा स्रोत, तसेच अशोक खरात आणि चाकणकर कुटुंबीयांमधील संबंध याबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास यंत्रणा आता बँक व्यवहार, खात्यांची हालचाल आणि संबंधित दस्तऐवजांची छाननी करत असल्याची माहिती समोर येत आहे.

Raj thackeray : “महाराष्ट्र दिन सुतकी पद्धतीने साजरा होतोय”

दरम्यान, प्रतिभा चाकणकर यांनी यापूर्वी सर्व आरोप फेटाळून लावत आपल्या नावाने बनावट खाती उघडण्यात आल्याचा दावा केला होता. त्यानंतर शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय यांची तब्बल आठ तास संयुक्त चौकशी केली होती. या चौकशीत त्यांच्या आर्थिक व्यवहारांचा स्रोत, संबंधित खात्यांमधील रक्कम आणि अशोक खरात यांच्याशी असलेले व्यवहार याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली होती.

आता या प्रकरणात थेट ईडीच्या चौकशीला सुरुवात झाल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. आगामी काळात या चौकशीतून आणखी काही धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून राज्याच्या राजकारणात या प्रकरणाचे पडसाद अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.

error: Content is protected !!