raj-thackeray-criticizes-government-over-maharashtra-day-hutatma-smarak-post : हुतात्मा स्मारकाच्या अवस्थेवरून राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा
Mumbai: महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत मुंबईतील हुतात्मा स्मारकाच्या अवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्म्यांच्या स्मृतींप्रती सरकार आणि मराठी समाजामध्ये वाढत चाललेल्या अनास्थेबद्दल त्यांनी खंत व्यक्त करत मराठी जनतेला भावनिक साद घातली आहे. महाराष्ट्र दिन केवळ औपचारिकतेपुरता साजरा केला जात असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतील हुतात्मा स्मारकाला अभिवादन केल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावर सविस्तर पोस्ट शेअर केली. “महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा” देत सुरू झालेल्या या पोस्टमध्ये त्यांनी सरकारच्या कार्यक्रमांमधील उत्साहाच्या अभावावर टीका केली. हुतात्मा स्मारक परिसरात योग्य सजावट नसल्याचे सांगत त्यांनी सरकारी यंत्रणेचा अनुत्साह स्पष्टपणे जाणवत असल्याचे म्हटले.
LPG shortage : नागपूरकरांना मोठा दिलासा! गॅस सिलिंडरचा पुरवठा आता दुप्पट
राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र दिन हा राज्याच्या अस्मिता आणि स्वाभिमानाशी निगडित दिवस असूनही सरकारकडून तो केवळ एक सरकारी औपचारिकता म्हणून साजरा केला जात आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या इतिहासाकडे आणि हुतात्म्यांच्या बलिदानाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. केंद्रातील काही वरिष्ठ नेत्यांच्या मनात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्याची सल असल्यामुळे राज्य सरकार महाराष्ट्र दिनाबाबत उत्साह दाखवत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
“जर हा दिवस इतर कोणत्या प्रभावशाली समूहाशी संबंधित असता तर मोठ्या प्रमाणात रोषणाई, सजावट आणि सरकारी उत्सव दिसला असता. मात्र महाराष्ट्राच्या अभिमानाच्या दिवशी सुतकी वातावरण निर्माण केले जाते,” असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. सरकारला मराठी माणसाला हुतात्मा स्मारकाचा विसर पडावा असे वाटते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Devendra fadnavis : “पेरणीची घाई नको”; महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे शेतकऱ्यांना आवाहन
यावेळी त्यांनी मराठी जनतेलाही आत्मपरीक्षणाचे आवाहन केले. मुंबईतील हुतात्मा स्मारक हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचे प्रतीक असायला हवे होते, मात्र अपेक्षित प्रमाणात नागरिक येथे येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “मुंबई ही मराठी माणसाच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा कणा आहे. हे शहर मराठी माणसांनी घडवले आणि संघर्षातून मिळवले, पण आपणच हा इतिहास विसरत चाललो आहोत,” असे ते म्हणाले.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास विसरू नये, हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण कायम ठेवावे आणि पुढील वर्षी १ मे रोजी मोठ्या संख्येने हुतात्मा स्मारकाला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी मराठी भाषिकांना केले. मराठी समाज मोठ्या प्रमाणात स्मारकाला भेट देऊ लागला तर सरकारलाही या प्रश्नाची दखल घ्यावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
__








