व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Bachchu kadu : मी भाजपसोबत ‘मॅच’ होऊ शकत नाही; बच्चू कडूंची स्पष्ट...

Bachchu kadu : मी भाजपसोबत ‘मॅच’ होऊ शकत नाही; बच्चू कडूंची स्पष्ट भूमिका

bachchu-kadu-shiv-sena-entry-political-stand-on-bjp-eknath-shinde-maharashtra : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर व्यक्त केला विश्वास

Mumbai : प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख तथा शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणारे माजी आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी स्वतःच्या पक्षाचे विलिनीकरण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करत भाजपसोबत आपले विचार जुळत नसल्याचे उघडपणे सांगितले. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

विधान परिषद उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बच्चू कडू रायगडावर पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेत त्यांनी आपल्या नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवरायांच्या आशीर्वादाने होत असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी त्यांनी शेतकरी, दिव्यांग आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठीच आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले. झेंडा बदलला असला तरी अजेंडा तोच असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.

Sunetra Pawar : ‘पवार विरुद्ध पवार’ संघर्षाला पूर्णविराम? भविष्यात सामना टाळणार; नागपुरात सुनेत्रा पवारांचे मोठे विधान

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाबद्दल बोलताना बच्चू कडू यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची संकल्पना, शेतकरी कर्जमाफी आणि ग्रामीण भागातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी शिंदे सकारात्मक भूमिका घेत असल्याचा दावा त्यांनी केला. राज्यातील सामान्य माणसाच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अधिक ताकदीने लढता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मात्र, “मी भाजपसोबत मॅच होऊ शकत नाही,” या एका वाक्यामुळे राज्यातील सत्ताधारी महायुतीत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. बच्चू कडू यांच्या या वक्तव्याचा अर्थ केवळ वैचारिक मतभेद आहे की भविष्यातील राजकीय संकेत, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. दुसरीकडे, पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू हे मूळचे शिवसैनिक असल्याचे सांगत त्यांचे स्वागत केले. पूर्वी शिवसेनेत काम केलेल्या बच्चू कडूंचे घरवापसीसारखे पुनरागमन असल्याचेही शिंदे यांनी म्हटले.

दरम्यान, महाराष्ट्र दिन आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरही बच्चू कडू यांनी परखड भूमिका मांडली. परप्रांतीयांना मराठी भाषा येत नसेल तर त्यांनी ती शिकली पाहिजे, असे सांगतानाच त्यांच्या रोजगारावर गदा येईल अशी भूमिका कोणत्याही नेत्याने घेऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले. संत ज्ञानेश्वरांच्या “हे विश्वची माझे घर” या विचारांचा दाखला देत समाजात संघर्ष नव्हे तर मानवता निर्माण होण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा उल्लेख करत मराठीचा अभिमान राखताना कोणाच्याही पोटावर पाय येऊ नये, असेही ते म्हणाले.

Bageshwar Baba controversy: बागेश्वर बाबाने नागपुरातून पळ काढला! धीरेंद्र शास्त्रींकडे कसलीही दिव्य शक्ती नाही; श्याम मानव यांचा घणाघाती आरोप

बच्चू कडू यांच्या शिवसेना प्रवेशाला त्यांच्या स्वतःच्या संघटनेतूनच विरोधp झाल्याचे चित्र समोर आले आहे. परभणी जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीनंतर नाराजी व्यक्त करत बच्चू कडूंनी आम्हाला विश्वासात न घेता निर्णय घेतल्याचा आरोप केला. जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांनी गेली अनेक वर्षे खांद्याला खांदा लावून काम करूनही निर्णय प्रक्रियेत स्थान न दिल्याची खंत व्यक्त केली. काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या वाहनांवरील प्रहार पक्षाचे नाव काढून टाकत पुढील राजकीय दिशा सामूहिकपणे ठरवणार असल्याचे सांगितले.

बच्चू कडू यांच्या या राजकीय निर्णयामुळे विदर्भासह मराठवाड्यातील ग्रामीण राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली असून आगामी काळात त्याचा परिणाम महायुतीच्या समीकरणांवरही दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!