Zishan siddiqi is in legislative election race : झिशान सिद्दिकी यांचं नाव पुढे येताच पक्षातील इच्छुकांना धक्का
Buldhaa विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा होताच राज्यातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा अनपेक्षित कलाटणी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडून झिशान सिद्धिकी यांचे नाव पुढे येताच, पक्षांतर्गत अनेक इच्छुकांच्या अपेक्षांना अचानक धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर तयार झालेले अनेक राजकीय समीकरणे विस्कटल्याचे स्पष्ट दिसत आहे.
विशेषतः बुलढाणा जिल्ह्यात या निर्णयाचे पडसाद अधिक तीव्रतेने उमटताना दिसत आहेत. यंदा उमेदवारी निश्चित मिळेल, या विश्वासावर काही स्थानिक नेते आणि त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू केली होती. नाझेर काझी यांच्या नावाभोवती मजबूत वातावरण निर्माण झाल्याचे चित्र होते. काही कार्यकर्त्यांनी तर संभाव्य विजयाच्या आनंदात अभिनंदनाचे बॅनरही तयार ठेवले होते, अशी चर्चा रंगली होती. मात्र, उमेदवारीची अधिकृत घोषणा होताच या सर्व तयारीवर पाणी फिरल्याचे दिसून आले.
या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, आधीच तयार केलेले बॅनर लावायचे की मागे घ्यायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकल्याची राजकीय वर्तुळात खुसखुशीत चर्चा रंगली आहे. या घडामोडींमुळे स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि नाराजी पुन्हा एकदा समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, विद्यमान आमदार अमोल मिटकरी यांच्या संदर्भातही विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. ज्यांचे नाव उमेदवारीसाठी जवळपास निश्चित मानले जात होते, त्यांचाच समावेश न झाल्याने राजकीय वर्तुळात उपरोधिक चर्चा रंगली आहे. “ज्यांचा पत्ता पक्का मानला जात होता, त्यांचाच कट झाला, तर इतरांनी अपेक्षा ठेवायची कशी?” असा सवाल उपस्थित होत आहे.
Water crisis : खामगावात ‘ड्राय रन’ कायम; पाणीपुरवठ्यावरून राजकारण तापलं!
हा निर्णय केवळ उमेदवारीपुरता मर्यादित नसून, आगामी राजकीय डावपेचांचा भाग असू शकतो. पक्ष नेतृत्वाने भविष्यातील व्यापक समीकरणे लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सध्याच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवरही पुढील काळात राजकीय समीकरणे कशी बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








