Disqualification Sword Looms Over BSP Corporator Harshala Jaiswal : व्हीप झुगारल्याप्रकरणी जिल्हाध्यक्षांची विभागीय आयुक्तांकडे याचिका
Nagpur नागपूर महानगरपालिकेच्या आसीनगर झोन सभापती निवडणुकीत पक्षाचा आदेश (व्हीप) धाब्यावर बसवून काँग्रेसला मतदान करणाऱ्या बहुजन समाज पार्टीच्या एकमेव नगरसेविका हर्षला संजय जयस्वाल यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या बंडखोरीबद्दल त्यांना नगरसेवक पदावरून अपात्र घोषित करण्यासाठी बसपाचे जिल्हा अध्यक्ष योगेश लांजेवार यांनी विभागीय आयुक्तांकडे रीतसर याचिका दाखल केली असून, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
१५ एप्रिल रोजी झालेल्या आसीनगर झोन सभापती पदाच्या निवडणुकीत बसपाने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता. प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे यांच्या निर्देशानुसार जिल्हाध्यक्ष योगेश लांजेवार यांनी नगरसेविका हर्षला जयस्वाल यांना तसा पक्षादेश बजावला होता. मात्र, हा आदेश झुगारून त्यांनी काँग्रेस उमेदवाराला मतदान केल्याने पक्षाच्या शिस्तीचा भंग झाला. या घटनेनंतर पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावून चौकशी समिती नेमली होती. मोहनराव राईकवार, दादारावजी उईके आणि माजी सनदी अधिकारी संजय थूल यांच्या समितीने जयस्वाल यांचा माफीनामा फेटाळून लावत त्यांच्यावर कडक कारवाईची शिफारस केली.
Ashish Jaiswal : संजय राऊत म्हणजे बुद्धी भ्रष्ट झाल्याचे जिवंत उदाहरण; आशिष जयस्वाल यांची टीका
या शिफारशीनुसार आता महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था सभासद अपात्रता कायद्यांतर्गत विभागीय आयुक्तांसमोर ही याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील ‘लॉ चार्टर्ड’ संस्थेचे बॅरि. विनोद तिवारी आणि ॲड. शौनक कोठेकर यांच्यामार्फत ही कायदेशीर लढाई लढली जात आहे. ६ मे रोजी विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी पार पडली असून, आता ही याचिका प्रतिवाद्यांना उत्तरासाठी पाठवली जाणार आहे.
Chandrashekhar Bawankule : ममता बॅनर्जींचे ‘थर्ड डिग्री’ राजकारण जनतेने उध्वस्त केले
या याचिकेत हर्षला जयस्वाल यांना अपात्र ठरवून पुढील सहा वर्षांसाठी कोणतीही निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याची आणि संबंधित प्रभागात नव्याने निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली आहे. कायद्यानुसार ९० दिवसांच्या आत यावर निकाल अपेक्षित असून, बसपाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता जयस्वाल यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे.








