व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण उमरखेडमध्ये काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीवर भर

उमरखेडमध्ये काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीवर भर

व्यक्तिकेंद्रित राजकारणाला बाजूला ठेवण्याचा नेत्यांना सल्ला

Umarkhed : काँग्रेस पक्षाची खरी ताकद एखाद्या नेत्याच्या वैयक्तिक प्रभावात नसून संघटित कार्यकर्त्यांच्या सामूहिक शक्तीत असते. त्यामुळे पक्ष संघटना अधिक सक्षम आणि स्वयंपूर्ण करायची असेल, तर व्यक्तिकेंद्रित राजकारणाला बाजूला ठेवून संस्थात्मक कार्यपद्धती विकसित करणे गरजेचे आहे. त्यासाठी आर्थिक स्वावलंबन, जबाबदाऱ्यांचे योग्य विभाजन आणि कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे काम करण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे, अशा स्पष्ट शब्दांत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. सचिन नाईक यांनी उमरखेडमधील पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला.

उमरखेड येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवसरकर, सभापती तातू देशमुख, तालुकाध्यक्ष अनिल कदम, प्रेमराव वानखडे, ख्वाजाभाई, बाळासाहेब चंद्रे यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी नाईक यांनी उमरखेड तालुका काँग्रेसच्या संघटनात्मक कार्यपद्धतीतील त्रुटींवर बोट ठेवले. तालुका काँग्रेस कमिटीचे स्वतःच्या मालकीचे स्वतंत्र आणि कायमस्वरूपी कार्यालय असणे आवश्यक आहे. पक्षाच्या दैनंदिन कामकाजासाठी आर्थिक नियोजन आणि स्वावलंबन महत्त्वाचे आहे. संघटनेचे काम एखाद्या व्यक्तीच्या इच्छेवर, उपस्थितीवर किंवा उपलब्धतेवर अवलंबून राहता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

गडचिरोलीत नक्षलवाद संपला आता जिल्ह्याला विकासाच्या पहिल्या रांगेत आणणार!

केवळ पदांचे वाटप केल्याने संघटना मजबूत होत नाही. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या पदाची जबाबदारी प्रत्यक्ष कामातून सिद्ध केली पाहिजे. कामाचे नियोजन, जबाबदाऱ्यांचे विकेंद्रीकरण आणि नियमित कार्यपद्धती यांमुळेच संघटनेला स्वतंत्रपणे निर्णय घेऊन काम करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

पक्षातील विविध सेल आणि विभाग केवळ कागदोपत्री अस्तित्वात न राहता त्यांनी प्रत्यक्ष मैदानात सक्रिय झाले पाहिजे. नव्या नेतृत्वाची क्षमता असलेल्या कार्यकर्त्यांना संधी देण्याऐवजी त्यांना केवळ पदांच्या प्रतीक्षेत ठेवणे पक्षाच्या भविष्यासाठी हितावह नाही. तरुणांना पक्षाशी जोडून त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपविण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून घेतल्या, त्यांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष काम केले, तरच पक्षाला वस्तुस्थितीचा योग्य अभिप्राय मिळेल. जनतेशी सातत्याने संपर्क ठेवणे आणि जनसेवेला प्राधान्य देणे, हाच पक्षविस्ताराचा प्रभावी मार्ग आहे, असा कानमंत्र नाईक यांनी कार्यकर्त्यांना दिला.

अमरावतीच्या राजकारणात बावनकुळे विरुद्ध वानखडे; आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले

त्यांच्या परखड मार्गदर्शनामुळे पदग्रहण सोहळ्याला केवळ औपचारिक कार्यक्रमाचे स्वरूप न राहता काँग्रेसच्या संघटनात्मक भवितव्याबाबत विचारमंथनाचे व्यासपीठ मिळाले. उमरखेडमध्ये पक्षाची ताकद वाढविण्यासाठी गटबाजी आणि व्यक्तिकेंद्रित कार्यपद्धतीच्या पलीकडे जाऊन सामूहिक नेतृत्व उभे करण्याचे आव्हान या निमित्ताने अधोरेखित झाले.

error: Content is protected !!