मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मोठी घोषणा
Gadchiroli : एकेकाळी नक्षलवादामुळे ओळखल्या जाणाऱ्या आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात आता विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. आदिवासी भागातील नक्षलवाद संपुष्टात आल्याचा दावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार व्यक्त केला. या जिल्ह्याला विकसित करून विकासाच्या नव्या दिशेने पुढे नेणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित जनजातीय गौरव दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन उपस्थित होते.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथे आयोजित विशेष सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी आदिवासी समाजाच्या ऐतिहासिक योगदानासह विकासाच्या विविध मुद्द्यांवर भाष्य केले. संपूर्ण देशाच्या पातळीवरील जनजातीय गौरव दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा मान महाराष्ट्रातील गडचिरोलीला मिळणे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.
अमरावतीच्या राजकारणात बावनकुळे विरुद्ध वानखडे; आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले
आदिवासी समाजाचा इतिहास अत्यंत गौरवशाली आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक आदिवासी क्रांतिकारकांनी मोठा संघर्ष केला; मात्र त्यांचा इतिहास आणि बलिदानाला अपेक्षित स्थान मिळाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या महानायकांचा इतिहास देशासमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण काम सुरू झाले आहे. भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला स्वाभिमानाची जाणीव करून दिली आणि अन्यायाविरोधात संघर्षाची प्रेरणा दिली, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पूर्वी आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न झाले. मात्र आता शासनाच्या विविध योजना दुर्गम भागातील गावांपर्यंत पोहोचत आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून आदिवासी तरुणांना प्रोत्साहन दिले जात असून, विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सरकारच्या विविध विकासात्मक प्रयत्नांमुळे नक्षलवादाला आळा घालण्यात यश मिळाले असून, गडचिरोली जिल्ह्यात विकासाची नवी सुरुवात झाली आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करत जनजातीय गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाच्या स्वाभिमानाचे प्रतीक असून, त्यांनी अन्याय, शोषण, फसवणूक आणि धर्मांतराच्या विरोधात संघर्ष केला, असे ते म्हणाले. आदिवासी समाजाच्या विकासाच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी पावले उचलण्यात आली. आज दुर्गम भागातील शेवटच्या घरापर्यंत विकासाच्या योजना पोहोचत आहेत. गडचिरोली हा आता राज्याच्या विकासाच्या प्रवाहातील शेवटचा जिल्हा राहणार नाही, तर विकासाचा पहिला जिल्हा म्हणून ओळख निर्माण करेल. आधुनिक पायाभूत सुविधा आणि विकासकामांच्या माध्यमातून जिल्ह्याचे चित्र बदलण्याचे काम सरकार करीत आहे, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
‘मंत्र्यांची ही अवस्था तर सामान्यांचे काय?’; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्यातून आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, नक्षलवादमुक्त विकासाची संकल्पना आणि गडचिरोलीच्या भविष्यातील वाटचालीचा संदेश देण्यात आला.








