neet-2026-exam-cancelled-paper-leak-cbi-probe-re-exam-announcement : 22 लाख विद्यार्थ्यांवर पुन्हा परीक्षेची वेळ
New Delhi : देशभरातील लाखो वैद्यकीय प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली NEET-UG 2026 परीक्षा केंद्र सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला असून पेपरफुटीच्या गंभीर आरोपांनंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. देशभरात तब्बल 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, तर महाराष्ट्रातील जवळपास अडीच लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.
परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील अनेक प्रश्न परीक्षा होण्याच्या तब्बल 42 तास आधी सोशल मीडियावर आणि काही मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर फिरत असल्याचा आरोप समोर आला होता. राजस्थानसह काही राज्यांमध्ये तथाकथित ‘गेस पेपर’मधील अनेक प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे तपासात समोर आल्यानंतर प्रकरण अधिक गंभीर बनले. त्यानंतर केंद्र सरकारने केंद्रीय तपास यंत्रणा आणि कायदा अंमलबजावणी संस्थांकडून आलेल्या अहवालांचा आढावा घेत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.
एनटीएकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, आता NEET-UG 2026 ची परीक्षा नव्याने घेतली जाणार आहे. नव्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने अर्ज करण्याची गरज भासणार नाही. 3 मे रोजी देण्यात आलेली परीक्षा केंद्रे कायम राहतील तसेच कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र नव्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नवीन प्रवेशपत्र जारी केले जाणार आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. पेपरफुटीमागे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून विविध राज्यांमध्ये तपास यंत्रणांनी छापेमारी सुरू केली आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष पथकानेही या प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचा दावा केला आहे.
Nida khan : महत्त्वाचे पुरावे हाती, निदा खानची कारागृहात रवानगी
NEET परीक्षा रद्द झाल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. “ही परीक्षा राहिलेली नाही, NEET आता लिलाव बनला आहे,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. लाखो विद्यार्थ्यांनी वर्षभर कष्ट करून अभ्यास केला आणि त्यांच्या भविष्यासोबत खेळ करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या दहा वर्षांत अनेक पेपरफुटीच्या घटना घडल्याचा उल्लेख करत विद्यार्थ्यांचा सरकारवरील विश्वास ढासळल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनीही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ‘गेस पेपर’मधील अनेक प्रश्न जसेच्या तसे मूळ प्रश्नपत्रिकेत आल्याचा दावा करत त्यांनी परीक्षांमध्ये पैशांचा मोठा खेळ होत असल्याचा आरोप केला. काही दलालांच्या फायद्यासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ केला जात असल्याचे सांगत या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, परीक्षा रद्द झाल्यामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि मानसिक तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या तयारीनंतर पुन्हा परीक्षा द्यावी लागणार असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. आता नव्या परीक्षेच्या तारखेकडे आणि सीबीआय चौकशीच्या निष्कर्षांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
___








