Due to the initiative of Sudhir Mungantiwar, Roshan Kude received ₹5 lakh assistance from the Chief Minister’s Relief Fund : आ. मुनगंटीवारांची मागणी अन् मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत
Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथुर येथील रोशन शिवदास कुळे यांच्या कुटुंबावर ओढवलेल्या आर्थिक संकटाला अखेर आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संवेदनशील पुढाकारामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सावकारी पाश आणि कर्जाच्या विळख्यात अडकून किडणी विक्रीसारख्या अत्यंत वेदनादायी निर्णयापर्यंत पोहोचलेल्या रोशन कुळे यांच्या मदतीसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लक्ष रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.
रोशन कुळे यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची झाली होती. त्यांच्या शेतजमिनी सावकारांकडे गहाण असल्याने संपूर्ण कुटुंब हतबल झाले होते. या पार्श्वभूमीवर कुळे यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयात आपली कैफियत मांडली होती. कुटुंबाची ही व्यथा ऐकल्यानंतर आ. मुनगंटीवार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली आणि या प्रकरणात तातडीने मदत देण्याची आग्रही मागणी केली.
Sudhir Mungatiwar : राजकारणापलीकडचं नेतृत्व : प्रश्न जनतेचे, लढा मुनगंटीवारांचा
यासंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केवळ मागणीच केली नाही, तर मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य मंजूर होईपर्यंत शासनाकडे अधिकृत पत्रव्यवहार करत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित विभागांशी प्रभावी समन्वय साधत हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलतेने लावून धरले. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोशन कुळे यांना ५ लक्ष रुपये मंजूर करण्याचा निर्णय घेतला.या मदतीमुळे संकटाच्या अंधारात सापडलेल्या कुळे कुटुंबाला मोठा मानसिक आणि आर्थिक आधार मिळाला आहे.
आमच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळात आमचे दुःख समजून घेत मदतीसाठी धावून येणारे नेतृत्व म्हणजे आ. सुधीर मुनगंटीवार. त्यांच्या संवेदनशील भूमिकेमुळे आम्हाला नवा आधार मिळाला, अशा शब्दांत कुळे कुटुंबाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, येत्या १९ तारखेला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रोशन कुळे यांना ५ लक्ष रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचे आभार मानले आहेत.








