
modi-government-big-decision-on-silver-import-restrictions-impact-on-bullion-market : निर्बंधांमुळे सराफा बाजारात खळबळ, दर आणखी भडकण्याची शक्यता
New Delhi : अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक व्यापार व्यवस्थेवर निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम आता भारताच्या सराफा बाजारावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील अस्थिरतेमुळे इंधन पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीवर दबाव वाढत असतानाच केंद्र सरकारने चांदी आयातीबाबत मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे. सोने-चांदीवरील आयात शुल्क 15 टक्क्यांपर्यंत वाढवल्यानंतर आता केंद्र सरकारने चांदीच्या आयातीवर थेट निर्बंध लागू करत सराफा बाजाराला मोठा धक्का दिला आहे. या निर्णयामुळे आगामी काळात चांदीचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून व्यापारी आणि उद्योग क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या अधिसूचनेनुसार, आतापर्यंत ‘मुक्त’ श्रेणीत असलेले चांदीचे अनेक प्रकार आता ‘प्रतिबंधित’ श्रेणीत टाकण्यात आले आहेत. त्यामुळे परदेशातून चांदी आयात करण्यासाठी आयातदारांना केंद्र सरकारची विशेष परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. सरकारच्या मते, वाढत्या आयातीमुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण निर्माण होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. अनावश्यक आयातीवर नियंत्रण ठेवून आर्थिक शिस्त राखण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.
नव्या नियमांनुसार 99.9 टक्के शुद्धतेची चांदी, चांदीच्या लगड्या, नैसर्गिक स्वरूपातील चांदी, वळ्या, अर्ध-प्रक्रिया केलेली चांदी तसेच पावडर स्वरूपातील चांदी यांच्या आयातीसाठी आता स्पष्ट सरकारी मंजुरी आवश्यक राहणार आहे. विशेष म्हणजे चांदीसोबतच प्लॅटिनमच्या आयातीवरही समान प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. काही आयात व्यवहार आता थेट रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार नियंत्रित केले जाणार असल्याने आयात प्रक्रियेवर अधिक कडक देखरेख ठेवली जाणार आहे.
वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात भारतातील चांदी आयात दुपटीहून अधिक वाढून तब्बल 411 दशलक्ष डॉलरवर पोहोचली होती. 2025-26 या आर्थिक वर्षात वाढलेल्या किमती आणि वाढत्या मागणीमुळे चांदी आयात सुमारे 150 टक्क्यांनी वाढून 12 अब्ज डॉलर म्हणजेच 7,334.96 टनांपर्यंत गेल्याचे समोर आले आहे. या वाढत्या आयातीमुळे सरकारने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
Sudhir mungantiwar : पाण्यासाठी तिसरे महायुद्ध टाळायचे असेल तर ‘जलयोद्धे’ तयार करा
या निर्बंधांचा थेट परिणाम सराफा बाजारावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयात कमी झाल्यास बाजारात चांदीचा पुरवठा घटणार असून मागणी मात्र कायम राहणार आहे. परिणामी चांदीच्या दरात मोठी उसळी येण्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. सुवर्णनगरी जळगावसह राज्यातील अनेक बाजारांमध्ये आधीच दर ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहेत. सध्या जीएसटीसह सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 1 लाख 63 हजार रुपयांवर पोहोचला असून चांदीचा दर प्रति किलो 2 लाख 75 हजार रुपयांच्या घरात गेला आहे.
Parth pawar : राष्ट्रवादीत गुप्त हालचालीं; बावनकुळेंचं सूचक विधान चर्चेत !
चांदी ही केवळ दागिन्यांपुरती मर्यादित नसून आधुनिक उद्योगव्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा धातू मानली जाते. सौर पॅनेल निर्मिती, विद्युत स्विच, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, रासायनिक उद्योग तसेच वैद्यकीय उपकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात चांदीचा वापर केला जातो. त्यामुळे आयात निर्बंधांमुळे उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता असून इलेक्ट्रॉनिक आणि औद्योगिक क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसू शकतो. वाढत्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे हे पाऊल आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्था आणि सराफा बाजारासाठी निर्णायक ठरणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.








