व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Nitin Gadkari : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या आईचे अश्रू पाहून घेतला जलसंवर्धनाचा संकल्प

Nitin Gadkari : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या आईचे अश्रू पाहून घेतला जलसंवर्धनाचा संकल्प

nitin-gadkari-emotional-story-behind-purti-jal-samvardhan-mission-nagpur : नितीन गडकरींनी सांगितला ‘पूर्ती’च्या स्थापनेमागचा भावूक प्रवास

Nagpur : राजकारणात राहून समाजकारण करणे आणि जनतेची सेवा करणे हेच माझे खरे ध्येय असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. शिक्षण, आरोग्य आणि शेती क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेत्यांना स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी पोस्टर किंवा बॅनर लावण्याची गरज पडत नाही, जनता त्यांचे काम ओळखते, असे सांगत त्यांनी जलसंवर्धनाच्या कार्यामागील अत्यंत भावूक प्रवास उलगडून सांगितला. ‘पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या’ रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘नागपूर जलसंवाद’ कार्यक्रमात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

जलसंवर्धनाच्या कार्याची सुरुवात कशी झाली, याविषयी बोलताना नितीन गडकरी यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचा काळ आठवला. त्या काळात विदर्भात दहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या पदयात्रेदरम्यान आपण एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी गेलो होतो, अशी आठवण त्यांनी सांगितली. त्या घरातील आई दुःखाने ढसाढसा रडत होती. तिच्या वेदना शब्दांत मांडताना माझ्याही डोळ्यात अश्रू आले होते. त्या घटनेनंतर मी प्रचंड अस्वस्थ झालो होतो. हिंगणघाट येथे भोजनाची व्यवस्था असतानाही मला घास गिळला गेला नाही. आपण राजकारणात असूनही शेतकऱ्यांच्या समस्या सोडवू शकत नसू, तर आपल्या राजकारणाचा उपयोग काय, हा प्रश्न मनाला सतावत होता. त्याच रात्री जलसंधारणासाठी काम करण्याचा दृढ संकल्प केला, असे गडकरी यांनी भावूक होत सांगितले.

Nagpur university : कुलगुरू बदलले तरी नागपूर विद्यापीठाचा कारभार ‘जैसे थे’

 

सरकारने सर्व कामे केली असती तर देश केव्हाच बदलला असता, मात्र केवळ शासनावर अवलंबून राहून विकास शक्य नाही. समाज जागृत झाला पाहिजे आणि लोकसहभागातूनच मोठे परिवर्तन घडू शकते, या विचारातून ‘पूर्ती’ संस्थेची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

धापेवाडा येथील स्वतःच्या शेतीचा उल्लेख करताना गडकरी म्हणाले की, ती माझ्यासाठी केवळ शेती नसून एक प्रयोगशाळा आहे. तेथे विविध प्रयोग करण्यात आले असून आज त्या प्रकल्पाचा अडीच हजार कोटी रुपयांचा टर्नओव्हर झाला आहे. एका एकरात ८८ टन ऊस आणि सेंद्रिय पद्धतीने १५ क्विंटल तुरीचे उत्पादन घेण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी आता ‘फ्लेक्स इंधन’वर चालणारे ट्रॅक्टर विकसित करण्यावर भर दिला जात असून त्यामुळे शेतकऱ्यांची दरवर्षी मोठी बचत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Ashok kharat :17 गुन्हे, 105 साक्षीदार, ईडीचा तपास अन् राजकीय कनेक्शनमुळे प्रकरण अधिक गंभीर!

बुलढाणा जिल्ह्यातील उदाहरण देताना गडकरी म्हणाले की, एकेकाळी पाण्याअभावी तेथील शेतकरी गाव सोडून जात होते. मात्र महामार्ग उभारणीदरम्यान काढलेल्या मातीचा वापर करून ३६ तलाव तयार करण्यात आले आणि त्यांचे मोफत खोलीकरण करण्यात आले. त्यानंतर त्या भागातील परिस्थितीत मोठा बदल झाल्याचे त्यांनी सांगितले. जलसंवर्धनाच्या कामांसाठी भविष्यात ‘डीपीआर’ मोफत करून देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये पाण्याचे गंभीर संकट असल्याचे सांगत गडकरी यांनी पाणी साठवणूक आणि संवर्धन हाच त्यावरचा एकमेव उपाय असल्याचे स्पष्ट केले. एका बाजूला पूरस्थिती आणि दुसऱ्या बाजूला पिण्याच्या पाण्याची टंचाई हा मोठा विरोधाभास असल्याचे त्यांनी नमूद केले. सोलर पंप योजना आणि आदिवासी गावांपर्यंत बॅकवॉटरचे पाणी पोहोचवण्याचे काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Epfo pension : ईपीएफओचा मोठा प्लॅन; किमान पेन्शन तिप्पट होण्याची शक्यता

जलसंवर्धनाचे हे कार्य एकट्याने शक्य झाले नसून अनेक जलतज्ज्ञ, सहकारी आणि कार्यकर्त्यांच्या योगदानातून हा प्रवास घडल्याचे गडकरी यांनी सांगितले. जलसंवर्धन हे केवळ प्रकल्प नसून एक मिशन आहे. देशातील पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवायची असेल, तर या मोहिमेचे मोठ्या लोकचळवळीत रूपांतर होणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

_

error: Content is protected !!