
sudhir-mungantiwar-on-water-crisis-praises-nitin-gadkari-jal-samvad-nagpur : नितीन गडकरींच्या जलदृष्टीचे सुधीर मुनगंटीवारांकडून कौतुक
Nagpur : भविष्यात पाण्यासाठी तिसरे महायुद्ध होऊ नये, यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणावर जनजागृती आणि जलसंवर्धनाचे काम करण्याची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने ‘जलयोद्धा’ बनून पाणी वाचवण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी वने, सांकृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या पूर्ती सिंचन कल्याणकारी संस्थेच्या जलसंधारण क्षेत्रातील यशस्वी २५ वर्षांच्या निमित्ताने आयोजित ‘नागपूर जलसंवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते.
नागपूरमधील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री पंकज भोयर, आशिष जयस्वाल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी नितीन गडकरी यांच्या कार्यशैलीचे आणि दूरदृष्टीचे विशेष कौतुक केले. गडकरी हे सामान्य राजकारण्यांपेक्षा वेगळे नेतृत्व असल्याचे सांगताना त्यांनी “असंभव” हा शब्द त्यांच्या शब्दकोशातच नसल्याचे नमूद केले.
Parth pawar : राष्ट्रवादीत गुप्त हालचालीं; बावनकुळेंचं सूचक विधान चर्चेत !
मुनगंटीवार म्हणाले की, नितीन गडकरी कोणताही विषय हातात घेतात, तेव्हा त्या विषयाला नवी दिशा आणि ऊर्जा मिळते. पर्यावरण संरक्षण, जलसंवर्धन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याबाबत गडकरी सातत्याने सकारात्मक विचार करत असतात. अनेकदा त्यांच्या गाडीत प्रवास करताना राजकारणाऐवजी केवळ पर्यावरण, शेती आणि जलव्यवस्थापनावरच चर्चा होत असल्याचा अनुभव त्यांनी यावेळी सांगितला.
जलसंवर्धनाच्या विषयावर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी मानवी स्वार्थी वृत्तीवरही भाष्य केले. आपण ज्या नद्यांचे पाणी पितो, त्याच नद्यांचे शोषण करत आहोत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. “सोन्याचे अंडे देणारी कोंबडी कापण्याची गोष्ट आपण ऐकली होती, आज नद्यांच्या बाबतीत आपण तेच करत आहोत,” असे सांगत त्यांनी पाण्याचे योग्य नियोजन आणि संवर्धन न झाल्यास विकास निरर्थक ठरेल, असा इशारा दिला.
Nitin Gadkari : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या आईचे अश्रू पाहून घेतला जलसंवर्धनाचा संकल्प
महाराष्ट्रात जलक्रांतीसाठी करण्यात आलेल्या उपक्रमांचाही त्यांनी उल्लेख केला. राज्यात सिंचन विभागाचे नाव बदलून ‘जलसंपदा विभाग’ करण्यात आले. तसेच ‘चला जाणूया नदीला’ या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील ७५ नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा प्रयत्न करण्यात आला आणि ११० नद्यांचा सखोल अभ्यास करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यावरण संवर्धनासाठी वनमंत्री म्हणून काम करताना ‘ग्रीन आर्मी’ची स्थापना केल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात २५५० किलोमीटरपर्यंत हरित क्षेत्र वाढवण्यात यश आल्याचा दावा त्यांनी केला. वन विभागानेही या कामाची नोंद घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Nagpur university : कुलगुरू बदलले तरी नागपूर विद्यापीठाचा कारभार ‘जैसे थे’
भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी “पाणी बचाव, पाणीदार राष्ट्र” ही संकल्पना देशभर राबवण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत जलजागृतीचे व्यापक आंदोलन उभे करण्याचे आवाहन केले. पाण्यासाठी संभाव्य संकट टाळण्यासाठी प्रत्येकाने आतापासूनच जबाबदारी स्वीकारून जलसंवर्धनासाठी सक्रियपणे काम करणे आवश्यक असल्याचे सांगत, स्वतःही या मोहिमेत पुढाकार घेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.








