amit-thackeray-slams-cm-devendra-fadnavis-over-bike-stunt-paper-leak-farmers-issue : अमित ठाकरेंचा फडणवीस सरकारवर घणाघात
Nagpur : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यादरम्यान नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. विदर्भातील शेतकरी आत्महत्या, पेपरफुटी प्रकरण, महिलांवरील अत्याचार आणि बेरोजगारी यांसारख्या गंभीर प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बाईक राइडवर उपरोधिक टीका केली.
“विदर्भात शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री मात्र जॉन अब्राहमसारखे बाईकवर फिरत आहेत. हे स्टंट आणखी किती दिवस चालणार?” असा थेट सवाल अमित ठाकरे यांनी उपस्थित केला. अवघ्या सहा मिनिटांच्या अंतरासाठी सहा-सहा बाईक्सचा ताफा कशासाठी लागतो, असा टोला लगावत त्यांनी सरकारच्या प्राधान्यक्रमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सरकारकडून वारंवार नागरिकांना देशभक्तीचे धडे दिले जात असल्याचा उल्लेख करत अमित ठाकरे म्हणाले की, “जनतेला सतत देशभक्ती दाखवण्याचे आवाहन केले जाते, पण सरकार म्हणून तुम्ही स्वतः काय करत आहात? तुम्ही कधी देशभक्ती दाखवणार?” असा उलट सवालही त्यांनी उपस्थित केला.
Pharmacist strike : उद्या राज्यातील मेडिकल बंद! देशभरात संपाची हाक
राज्यात सुरू असलेल्या पेपरफुटीच्या घटनांवर संताप व्यक्त करत त्यांनी शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “पेपर फुटण्याची ही पहिली वेळ नाही. पुण्यापासून हे सत्र सुरू झाले असून एक-एक पेपर १५ ते २० लाख रुपयांना विकला गेला आहे. एनटीएचएसमधील काही लोक खाजगी क्लासेसशी संबंधित आहेत. गरीब घरातील विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतो आणि दुसरीकडे श्रीमंत बापाचा मुलगा परीक्षा सुरू होण्याच्या १५ मिनिटे आधी पेपर पाहतो. यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे,” असे अमित ठाकरे म्हणाले.
पेपर लीकच्या घटनांमुळे काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा उल्लेख करत त्यांनी सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. “परीक्षा रद्द करणे हा यावरचा उपाय नाही. मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे की त्यांच्या राज्यात असे प्रकार घडू नयेत. पेपर लीक करणाऱ्यांवर अद्याप ठोस कारवाई का झाली नाही? या प्रकरणात असा कठोर कायदा आणला पाहिजे की गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
Vidhan parishad election : विधान परिषद निवडणुकीआधी महायुतीत ‘कोल्ड वॉर’!
पुण्यातील तीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणावरही अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. “एखाद्या लहान मुलीवर अत्याचार होतो, आपण दोन दिवस त्यावर बोलतो आणि नंतर अचानक दुसरा मुद्दा समोर आणून मूळ विषय बाजूला टाकला जातो,” असा आरोप त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावरही त्यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला. “देशातील ६० टक्के जनता दारिद्र्यरेषेखाली असून सरकार त्यांना रेशन पुरवते. मग सोने खरेदी कोण करतंय? जर सोने खरेदी करू नका असे सांगितले जात असेल, तर त्यामागचे कारण देशाला स्पष्ट केले पाहिजे,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी पंतप्रधानांनी पत्रकार परिषद घेऊन थेट पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत, अशी मागणीही केली. “मी काही एवढा जीनियस नाही, पण देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी एकदा समोर येऊन देशाची खरी परिस्थिती जनतेला सांगितली पाहिजे,” असे आव्हानात्मक वक्तव्य अमित ठाकरे यांनी केले.
Anil deshmukh : ‘आधी ओबीसींचा कॉलम आणा, मगच जनगणनेचे दप्तर उघडा’
मनसेच्या आंदोलनात्मक भूमिकेवर बोलताना ते म्हणाले की, “आमचा पक्ष स्थापन झाल्यापासून आमची आंदोलने आक्रमक राहिली आहेत. पण आता विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांसारखे गंभीर प्रकार घडत असताना केवळ मनसेवर अवलंबून न राहता माध्यमांनी आणि पत्रकारांनीही आक्रमक होऊन सरकारला जाब विचारण्याची वेळ आली आहे.”
विदर्भ दौऱ्यात अमित ठाकरे यांनी राज्यातील शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवरून सरकारला लक्ष्य करत आगामी काळात मनसे अधिक आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.
__








