व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Buldhana politics : जिल्हा राजकारणाचे ‘पॉवर सेंटर’ बनले जळगाव जामोद

Buldhana politics : जिल्हा राजकारणाचे ‘पॉवर सेंटर’ बनले जळगाव जामोद

Jalgaon Jamod Emerges as the ‘Power Center’ of District Politics : चार प्रमुख पक्षांच्या जिल्हास्तरीय नेतृत्वाची सूत्रे तालुक्याकडे; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाढले राजकीय महत्त्व

Jalgao Jamod बुलढाणा जिल्ह्यातील चार प्रमुख राजकीय पक्षांच्या जिल्हास्तरीय नेतृत्वाची सूत्रे आता जळगाव जामोद तालुक्याकडे केंद्रित झाल्याने तालुक्याच्या राजकीय वजनात लक्षणीय वाढ झाली आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या प्रमुख पक्षांचे जिल्हाध्यक्ष अथवा जिल्हाप्रमुख जळगाव जामोद तालुक्याशी संबंधित असल्याने जिल्हा राजकारणात तालुका नव्या राजकीय केंद्राच्या रूपात उदयास येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नुकतीच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे घाटाखालील भागातून प्रथमच काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद जळगाव जामोद तालुक्याकडे आल्याने या नियुक्तीला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करणे, नव्या नेतृत्वाला संधी देणे आणि ग्रामीण भागातील काँग्रेसची पकड मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.

Water crisis : धरण उशाशी, तरी गावांवर जलसंकट; देऊळगाव राजात पाणीटंचाईवरून प्रशासनावर टीका

यापूर्वी भाजपने सचिन देशमुख यांच्यावर पुन्हा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली होती. संघटन विस्तार, बूथस्तरावरील बळकटीकरण आणि ग्रामीण मतदारांमध्ये पक्षाचा प्रभाव वाढविण्याच्या दृष्टीने त्यांची पुनर्नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्यामुळे भाजपच्या जिल्हास्तरीय राजकारणातही जळगाव जामोद तालुक्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

उद्धवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी गजानन वाघ यांची नियुक्ती यापूर्वीच करण्यात आली असून जिल्ह्यातील संघटन विस्तार, कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करणे आणि आगामी निवडणुकांसाठी पक्ष रणनीती आखण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून बाजार समितीचे सभापती प्रसेनजित पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर ग्रामीण भागातील संघटनात्मक हालचालींना वेग आल्याचे मानले जात आहे.

Chikhli municipal council : भूखंड वाटप, पाणीपुरवठा, फ्लेक्सबाजीसह विविध विषयांवर खडाजंगी

चारही प्रमुख पक्षांचे जिल्हास्तरीय नेतृत्व जळगाव जामोद तालुक्याकडे आल्याने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तालुक्याचे राजकीय वजन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उमेदवारी निश्चिती, तिकीट वाटप, संघटनात्मक बांधणी आणि निवडणूक रणनीती यांसारख्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तालुक्याची भूमिका प्रभावी राहण्याची चर्चा रंगू लागली आहे.

error: Content is protected !!