व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Water crisis : धरण उशाशी, तरी गावांवर जलसंकट; देऊळगाव राजात पाणीटंचाईवरून प्रशासनावर...

Water crisis : धरण उशाशी, तरी गावांवर जलसंकट; देऊळगाव राजात पाणीटंचाईवरून प्रशासनावर टीका

Villages Face Water Crisis; Administration Criticised Over Water Scarcity in Deulgaon Raja : ५ गावांची टँकरवर मदार, ८ गावांसाठी टँकर प्रस्तावित; २४ गावांसाठी ३४ विहिरी अधिग्रहित, मात्र २५ लाखांचे अनुदान थकीत

Deulgao raja तालुक्यात वाढत्या तापमानासोबत पाणीटंचाईची तीव्रता वाढत असून ग्रामीण भागातील ग्रामस्थांना भीषण जलसंकटाचा सामना करावा लागत आहे. एका बाजूला तालुक्यातील महत्त्वाचा जलस्रोत असलेले खडकपूर्णा धरण अस्तित्वात असताना दुसऱ्या बाजूला गावागावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर आणि विहीर अधिग्रहणावर अवलंबून राहण्याची वेळ आल्याने प्रशासनाच्या नियोजनावर आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

तालुक्यातील पाच गावांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून आणखी आठ गावांसाठी टँकर प्रस्तावित आहेत. मात्र, प्रस्तावांना अद्याप मंजुरी न मिळाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दुसरीकडे तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर २४ गावांसाठी ३४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असले तरी मागील वर्षीच्या विहीर अधिग्रहणाचे तब्बल २५ लाख ५४ हजार ६०० रुपयांचे अनुदान अद्याप थकीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Chikhli municipal council : भूखंड वाटप, पाणीपुरवठा, फ्लेक्सबाजीसह विविध विषयांवर खडाजंगी

तालुक्यातील खडकपूर्णा धरण हे जिल्ह्यासह परजिल्ह्यांसाठीही महत्त्वाचा पाणीसाठा मानले जाते. मात्र, वर्षानुवर्षे रखडलेल्या पाणीपुरवठा योजना, प्रशासनातील नियोजनाचा अभाव आणि लोकप्रतिनिधींच्या आपापसातील मतभेदांमुळे गावागावातील पाणीप्रश्न अधिकच गंभीर झाल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. “डोळ्यांसमोर धरण असूनही गावांना पाणी मिळत नसेल, तर यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते?” असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

मे महिन्याच्या पूर्वार्धातच तालुक्यावर टंचाईचे तीव्र सावट निर्माण झाले असून आगामी दोन महिने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील एकूण ६२ गावांसाठी ४० ग्रामपंचायती कार्यरत असून अनेक गावांतील विहिरी आणि जलस्रोतांमध्ये केवळ पंधरा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत अधिग्रहित विहिरींमध्येच पाणी नसल्यास प्रशासन काय पर्याय उभा करणार, असा प्रश्न ग्रामस्थांसह प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.

District co-operative bank : संचालकांना आवर? जिल्हा बँक भरतीत ७० टक्के जागा स्थानिकांसाठी

खडकपूर्णा धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्यास नदीकाठच्या गावांना आणि पशुधनाला मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र, अद्याप पाणी सोडण्यात आले नसल्याने मुख्य नदीपात्रासह परिसरातील नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे जनावरांसह वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.

ग्रामस्थांची तहान भागावी म्हणून अनेक शेतकरी स्वतःच्या पिकांना पाणी न देता अधिग्रहित विहिरीचे पाणी गावांसाठी उपलब्ध करून देत आहेत. विहीर अधिग्रहणानंतर मालकांना प्रतिदिन ६०० रुपये मोबदला दिला जातो. मात्र, मागील वर्षाचा मोबदला अद्याप न मिळाल्याने यंदाचा कधी मिळणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. ग्रामपातळीवर प्रस्ताव गेल्यानंतर तातडीने सहकार्य करणाऱ्या शेतकऱ्यांच्या त्यागाकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Sanjay Gaikwad : ‘तुटवडा नाही’च्या दाव्याने बुलढाण्यात राजकारण तापले!

तालुक्यातील सावखेड नागरे, निमखेड, धोत्रा नंदाई, कुंभारी आणि मंडप या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तर अंधेरा, गोळेगाव, सुरा, पिंपळगाव, चिलमखा आणि सरंबा आदी गावांसाठी अतिरिक्त टँकर प्रस्तावित करण्यात आले असले तरी त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी सांगितले की, तालुक्यात पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्रामपातळीवरील विहीर अधिग्रहण प्रस्तावांना तातडीने मंजुरी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच थकीत मोबदल्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जात असून निधी उपलब्ध होताच विहीर मालकांना रक्कम वितरित केली जाईल.

error: Content is protected !!