bahujan-vikas-aaghadi-merge-with-shivsena-kshitij-thakur-mlc-election-2026 : विधान परिषद उमेदवारीसाठी शिंदेंची मोठी रणनीती
Mumbai: महायुतीतील विधान परिषद जागावाटपाच्या चर्चांना वेग आला असतानाच राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडी शिवसेनेत विलीन होण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामागे विधान परिषद निवडणुकीचे राजकारण असल्याचे बोलले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितीज ठाकूर यांना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. सध्या ही जागा शिवसेनेचे रवींद्र फाटक यांच्याकडे होती. मात्र आगामी निवडणुकीत फाटक यांच्या जागी क्षितीज ठाकूर यांना संधी देण्याची चर्चा आहे.
याचबरोबर बहुजन विकास आघाडीने शिवसेनेत विलीन व्हावे, असा प्रस्तावही ठाकूर पिता-पुत्रांसमोर ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतांची गणिते मजबूत करण्यासाठी शिवसेना ही राजकीय खेळी करत असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांची भूमिका काय राहणार आणि बविआ खरोखरच शिवसेनेत विलीन होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Akola Municipal corporation : मान्सूनपूर्व नालेसफाई रखडल्याने स्थायी समिती संतप्त; प्रशासनाला फैलावर
काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षानेही शिवसेनेत विलीन होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बच्चू कडू यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली होती. त्याच धर्तीवर आता बहुजन विकास आघाडीलाही ऑफर देण्यात आल्याची चर्चा आहे.
दरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 विधान परिषद जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. गेल्या दोन अडीच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे अनेक जागा रिक्त होत्या. आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
या निवडणुकीत सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना आणि नागपूर या मतदारसंघांचा समावेश आहे.
Sanjay Gaikwad : गायकवाड चौकशीच्या भोवऱ्यात; ‘शिवाजी कोण होता?’ वादाने राजकारण तापले
विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला असून 25 मे रोजी अधिसूचना जारी झाली आहे. 1 जून ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे. 2 जून रोजी अर्जांची छाननी होईल तर 4 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 18 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे.








