व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Akola Municipal corporation : मान्सूनपूर्व नालेसफाई रखडल्याने स्थायी समिती संतप्त; प्रशासनाला फैलावर

Akola Municipal corporation : मान्सूनपूर्व नालेसफाई रखडल्याने स्थायी समिती संतप्त; प्रशासनाला फैलावर

Standing Committee furious over delay in pre-monsoon drain cleaning; administration pulled up : एलईडी पथदिव्यांच्या देखभालीसाठी खासगी कंपन्यांचा प्रस्ताव फेटाळला; मनपाच करणार काम

Akola मान्सून अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही शहरातील मोठ्या नाल्यांची सफाई अद्याप सुरू न झाल्याने महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. स्थायी समितीचे सभापती विजय अग्रवाल यांच्यासह नगरसेवकांनी स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत तातडीने कामे सुरू करण्याचे निर्देश दिले. त्याचवेळी एलईडी पथदिव्यांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम खासगी कंपन्यांना देण्याचा प्रस्तावही समितीने नामंजूर केला.

मनपा स्थायी समितीची सभा स्थायी समिती सभागृहात पार पडली. सभेत पूर्व व उत्तर झोनमधील मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी प्राप्त ई-निविदांवर चर्चा करण्यात आली. कार्यकारी अभियंता अजय गुजर यांनी या कामासाठी तीन निविदा प्राप्त झाल्याची माहिती देत, सिंग कन्स्ट्रक्शनची निविदा सर्वात कमी दराची असल्याचे सांगितले.

Sanjay Gaikwad : गायकवाड चौकशीच्या भोवऱ्यात; ‘शिवाजी कोण होता?’ वादाने राजकारण तापले

मात्र, अद्याप महापालिकेकडून जेसीबीच्या माध्यमातून नाला सफाई सुरू का करण्यात आली नाही, असा सवाल नगरसेवक निलेश देव व विनोद मापारी यांनी उपस्थित केला. यावर स्वच्छता विभागप्रमुख प्रशांत राजूरकर यांनी वेळेत काम पूर्ण केले जाईल, असे स्पष्टीकरण दिले. मात्र, नगरसेवकांनी प्रशासनाच्या दिरंगाईवर नाराजी व्यक्त करत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.

विविध विकासकामांच्या निविदांना हिरवा कंदील
सभेत विविध प्रभागांतील नाली, रस्ते, काँक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक तसेच स्मशानभूमीतील टीनशेड बांधकाम आदी विकासकामांच्या ई-निविदांनाही मंजुरी देण्यात आली. जिल्हा नियोजन समितीअंतर्गत दलित वस्ती सुधार योजना २०२५-२६ अंतर्गत ही कामे करण्यात येणार असून, सुमारे १ कोटी १० लाख रुपयांच्या कामांबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आला.

Sindkhedraja APMC : सभापती-उपसभापतींचे राजीनामे; सिंदखेडराजा बाजार समितीत खळबळ

पथदिव्यांची दुरुस्ती महापालिकेकडूनच
एलईडी पथदिव्यांच्या देखभाल व दुरुस्तीच्या विषयावरही सभेत सविस्तर चर्चा झाली. सभापती विजय अग्रवाल यांनी महापालिकेने स्वतः हे काम केल्यास सुमारे दोन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले. तर खासगी कंपन्यांकडे काम दिल्यास हा खर्च पाच कोटी रुपयांपर्यंत जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर स्थायी समितीने खासगी कंपन्यांचा प्रस्ताव फेटाळून लावत पथदिव्यांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम महापालिकेनेच करावे, असे निर्देश प्रशासनाला दिले. तसेच, पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्य खरेदीच्या निविदेलाही मंजुरी देण्यात आली.

error: Content is protected !!