mva-vidhan-parishad-election-seat-sharing-final-decision-in-two-days : सर्व 17 जागा लढवण्याचा निर्णय, दोन दिवसांत जागावाटप अंतिम
Mumbai : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली असून सर्व 17 जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा पूर्ण झाली असून पुढील दोन दिवसांत अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट राजकीय सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईतील काँग्रेस प्रदेश मुख्यालय टिळक भवन येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना नेते आमदार अनिल परब, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी महाविकास आघाडी विधान परिषदेच्या सर्व जागा लढवणार असल्याचे स्पष्ट केले. विधान परिषदेवरील 16 जागा आणि नागपूर येथील पोटनिवडणूक अशा एकूण 17 जागांवर आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. जागावाटपावर सकारात्मक वातावरणात चर्चा झाल्याचे सांगत पुढील दोन दिवसांत पुन्हा बैठक घेऊन अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
Red heat alert : विदर्भात उष्णतेचा कहर, तीव्र लाट कायम 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट
यावेळी भाजपवर टीका करताना सपकाळ म्हणाले की, भाजप लोकशाही मानत नसून निवडणुकांमध्ये घोडेबाजार सुरू आहे. पैसा वापरून नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकशाही आणि राज्यघटनेच्या रक्षणासाठी महाविकास आघाडी एकजुटीने निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीत जागावाटपावरून कोणताही वाद नसून सुसंवाद असल्याचा दावा करताना त्यांनी महायुती सरकारमध्येच जागावाटपावरून मतभेद असल्याचा टोला लगावला. ‘गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन सरकारमध्ये जागावाटपावरून धुसफूस सुरू आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, गडचिरोली जिल्हा काँग्रेसमध्येही अंतर्गत वाद उघडपणे समोर आला आहे. जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून नाराज झालेल्या दहा तालुकाध्यक्षांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी मुंबईत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेत सामूहिक राजीनामे सादर केले. नवे जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे यांच्या पदग्रहण सोहळ्यानंतर अवघ्या एका दिवसात हा वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे गडचिरोलीतील काँग्रेस संघटनेत निर्माण झालेल्या असंतोषाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Cng price hike : 15 दिवसांत 12 रुपयांची दरवाढ, वाहनधारकांना मनस्ताप !
विधान परिषद निवडणुकीतील संभाव्य जागावाटपाबाबतही प्राथमिक चित्र समोर येऊ लागले आहे. काँग्रेसकडून सर्वाधिक सात ते आठ जागांवर उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे. शिवसेना (उबाठा) पाच ते सहा जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तीन ते चार जागांवर उमेदवार देऊ शकते. ज्या भागात ज्या पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक आहे, त्या जागांवर संबंधित पक्षाला प्राधान्य देण्याचे सूत्र आघाडीकडून स्वीकारले जाण्याची शक्यता आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीकडे सर्व पक्षांचे लक्ष लागले असून आगामी राजकीय समीकरणांसाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे.








