cng-price-hike-mumbai-pune-nashik-chhatrapati-sambhajinagar-fuel-price-increase : पेट्रोल-डिझेलनंतर सीएनजी चे दरही भडकले
Mumbai : पेट्रोल आणि डिझेल दरवाढीनंतर आता सीएनजीच्या किंमतींनीही सर्वसामान्य वाहनधारकांना मोठा झटका दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधन दर सातत्याने वाढत असताना आता सीएनजीच्या दरातही मोठी वाढ झाल्याने वाहनचालकांचा प्रवास खर्च वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरांमध्ये सीएनजीचे दर पुन्हा वाढले असून, गेल्या पंधरा दिवसांत तब्बल 12 रुपयांची वाढ झाल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत असून नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या दहा दिवसांत चौथ्यांदा वाढ झाली आहे. त्यानंतर आता सीएनजीच्या दरवाढीमुळे रिक्षा, टॅक्सी तसेच खासगी वाहनधारकांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता आहे. सीएनजीच्या वाढत्या किंमतीमुळे लवकरच टॅक्सी आणि कॅब सेवांच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रवाशांनाही या दरवाढीचा फटका बसणार आहे.
onion farmers relief : कांदा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राचा मोठा दिलासा
महानगर गॅस लिमिटेड अर्थात एमएनजीएलकडून सीएनजीच्या किरकोळ विक्री दरात प्रति किलो 2 रुपये 50 पैशांची वाढ करण्यात आली आहे. यानंतर सीएनजीचा दर 92 रुपये 25 पैशांवरून 94 रुपये 75 पैसे प्रति किलो इतका झाला आहे. वाढीव दर 27 मेच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत. इनपुट गॅसच्या वाढलेल्या खर्चामुळे दरवाढ करावी लागल्याचे एमएनजीएलने स्पष्ट केले आहे.
सीएनजीच्या वाढत्या दरामुळे सर्वाधिक फटका रिक्षा आणि टॅक्सी चालकांना बसण्याची शक्यता आहे. शहरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही या दरवाढीचा परिणाम होऊ शकतो. खासगी वाहनधारकांचाही मासिक इंधन खर्च वाढणार असून, सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्येही पेट्रोल आणि डिझेलनंतर सीएनजीच्या दरात किलोमागे 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. बीपीसीएल पंपावर नवीन दर लागू करण्यात आले आहेत. गेल्या पंधरा दिवसांत सीएनजीमध्ये तब्बल 12 रुपयांची वाढ झाल्याने वाहनधारक संतप्त झाले आहेत. सध्या शहरात पेट्रोलचा दर 112 रुपये 88 पैसे तर डिझेलचा दर 99 रुपये 50 पैसे प्रति लिटरवर पोहोचला आहे.
नाशिकमध्येही सीएनजीच्या दरात 1 रुपये 35 पैशांची वाढ करण्यात आली आहे. यानंतर नाशिकमध्ये सीएनजीचा दर प्रति किलो 96 रुपये 50 पैसे इतका झाला आहे. यापूर्वी वाहनधारकांना 95 रुपये 15 पैसे दराने सीएनजी उपलब्ध होत होते. 28 मेपासून नवीन दर लागू करण्यात आले आहेत. आखाती भागातील तणाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलत्या परिस्थितीमुळे इंधन दरवाढ होत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी या तिन्ही इंधनांच्या सातत्याने वाढणाऱ्या किंमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडत आहे. वाढत्या इंधन दरामुळे वाहतूक खर्च वाढणार असून त्याचा परिणाम महागाईवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाहनधारकांकडून आता सरकारने दर नियंत्रणासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली जात आहे.








