व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Mlc election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीतच ‘दगाफटका’ची भीती

Mlc election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीतच ‘दगाफटका’ची भीती

mahayuti-vidhan-parishad-election-seat-sharing-bjp-shiv-sena-dispute-news : जागावाटपावरून भाजप-शिवसेनेत वाढली नाराजी, काही जागांवर समीकरणे बदलण्याची शक्यता

Mumbai : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमधील विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत अंतर्गत तणाव वाढताना दिसत आहे. विधान परिषदेच्या एकूण 17 जागांसाठी निवडणूक होणार असून सर्व जागा जिंकण्याचा महायुतीचा दावा असला तरी जागावाटपावरून मित्रपक्षांमध्ये मतभेद तीव्र झाले आहेत. विशेषतः पुणे, रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या महत्त्वाच्या जागांवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला चार जागांची ऑफर देण्यात आली आहे. मात्र, शिवसेना सहा जागांच्या मागणीवर ठाम असल्याने अंतिम जागावाटप अद्याप जाहीर होऊ शकलेले नाही. अलीकडच्या काळात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची ताकद वाढल्याने पक्ष अधिकाधिक जागांवर दावा करत आहे. त्यामुळे भाजप कोणतीही जागा सहजासहजी सोडण्याच्या तयारीत नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Vijay Wadettiwar : पेट्रोल पाच रुपयाने महागले भाजपचे कार्यकर्ते कुठे लपून बसले?; वाडेट्टीवारांचा टोला

दरम्यान, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान भाजपकडून मिळालेल्या वागणुकीबाबत शिवसेना पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांमध्ये मोठी नाराजी असल्याचे समोर आले आहे. सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष उघडपणे दिसून आला होता. साताऱ्यात मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद आबा पाटील यांच्यात झालेल्या धक्काबुकीचे पडसाद विधानसभेतही उमटले होते.

या घटनांनंतर शिवसेना नेत्यांकडून जिल्हास्तरावर बैठकांचे सत्र सुरू करण्यात आले आहे. या बैठकींमध्ये अनेक नगरसेवक, आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपबाबतची नाराजी उघडपणे व्यक्त केल्याची माहिती आहे. काही जिल्ह्यांमध्ये भाजपला दूर ठेवून इतर पक्षांसोबत स्थानिक पातळीवर वेगळी आघाडी करण्याबाबतही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

Legislative elections : सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव; भाजपमध्ये चर्चांना उधाण, डॉ. राजीव पोतदारांचे तिकीट फायनल झाले का हो?

राजकीय जाणकारांच्या मते, काही जिल्ह्यांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात स्थानिक पातळीवर वेगळी समीकरणे तयार झाल्यास त्याचा थेट फटका भाजपच्या उमेदवारांना बसू शकतो. त्यामुळे वरच्या पातळीवर महायुती कायम ठेवण्याचे प्रयत्न सुरू असले तरी जिल्हास्तरावरील नाराजी आणि अंतर्गत खदखद निवडणुकीत परिणाम करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेषतः काही पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवरून मित्रपक्षांमध्ये नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. मित्रपक्षांना विश्वासात न घेता निर्णय घेतले जात असल्याची भावना अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. सोलापूरमधील शिवसेनेच्या कोअर कमिटी बैठकीतही ही नाराजी स्पष्टपणे मांडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Harshwardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर भाजप आक्रमक; बुलढाण्यात तीव्र आंदोलन

या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे काही मंत्री लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते. महायुतीत समन्वय राखण्यासाठी भाजप नेत्यांना योग्य सूचना द्याव्यात, अशी मागणी या बैठकीत केली जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, शिवसेनेकडून जिल्ह्यातील आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

विधान परिषद निवडणुकीत महायुती एकत्र राहणार की स्थानिक पातळीवरील नाराजीमुळे काही ठिकाणी ‘फ्रेंडली फाईट’ किंवा आडून विरोध होणार, याकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

___

error: Content is protected !!