व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Tukaram mundhe : तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’मध्ये; तीन दिवसांत 53 धाडी !

Tukaram mundhe : तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’मध्ये; तीन दिवसांत 53 धाडी !

tukaram-mundhe-fda-action-maharashtra-food-adulteration-raids-news : राज्यभरातून लाखोंचा भेसळयुक्त माल जप्त, 33 जण तुरुंगात

Mumbai : आपल्या कडक प्रशासकीय शैलीसाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच राज्यभरातील भेसळखोरांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच अन्न व औषध प्रशासनाने महाराष्ट्रभरात 53 धाडी टाकत भेसळयुक्त आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठ्यावर मोठी कारवाई केली आहे. या धडक मोहिमेत 33 जणांना अटक करण्यात आली असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तुकाराम मुंढे यांनी 25 मे रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या भेसळखोरांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रशासनाने बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागात एकाच वेळी विशेष धडक मोहीम सुरू केली. प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, अस्वच्छ अन्न उत्पादन आणि नियमबाह्य अन्नसाठा याविरोधात अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम राबवली.

Chhagan bhujbal : राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी छगन भुजबळांचे लॉबिंग तेजीत

राज्यातील विविध भागांमध्ये अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी संशयित आस्थापनांवर छापे टाकून एकूण 53 ठिकाणांची तपासणी केली. यापैकी 34 ठिकाणी बंदी असलेला गुटखा आणि पानमसाल्याची विक्री सुरू असल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी 25 गुन्हे दाखल केले असून 33 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच गुटखा वाहतूक करणारी पाच वाहने जप्त करण्यात आली असून 27 आस्थापनांवर थेट सीलची कारवाई करण्यात आली आहे.

या विशेष मोहिमेदरम्यान अन्न व औषध प्रशासनाने सुमारे 20 लाख 57 हजार 296 रुपयांचा बेकायदेशीर मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक मोठी कारवाई मुंबई विभागात करण्यात आली. मुंबईत 19 आस्थापनांवर धाडी टाकण्यात आल्या असून सर्व आस्थापनांना सील करण्यात आले आहे. याशिवाय 19 जणांविरोधात एफआयआर दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि दिशाभूल करणारे पॅकेजिंग यावर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले.

दरम्यान, गुटखा आणि पानमसाल्याव्यतिरिक्त राज्यातील अन्य 23 मोठ्या आस्थापनांचीही तपासणी करण्यात आली. या कारवाईत पॅकबंद पिण्याचे पाणी, दूध, नुडल्स, कार्बोनेटेड पेये, खाद्यतेल, स्वीट आणि फरसाण पदार्थ, आईस्क्रीम, ताडी, डिंक, मसाले, खवा, पनीर, तूप, बेसन आणि बेकरी उत्पादनांच्या शुद्धतेची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत तब्बल 28 लाख 78 हजार 572 रुपये किमतीचा संशयास्पद आणि नियमबाह्य अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.

Ramdas Athavale: आरपीआय विधान परिषद लढणार नाही; मात्र राज्यपाल कोट्यातून एका जागेवर रामदास आठवलेंचा दावा

अन्न व औषध प्रशासनाच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेले अनेक पदार्थ अस्वच्छ आणि असुरक्षित पद्धतीने तयार केले जात होते. या सर्व अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवालानंतर संबंधितांवर आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे अन्न व औषध प्रशासन पुन्हा राज्यात सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

error: Content is protected !!