व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Toxic liquor case : पुणे-पिंपरी चिंचवड विषारी दारूकांड प्रकरणात मृतांचा आकडा 18...

Toxic liquor case : पुणे-पिंपरी चिंचवड विषारी दारूकांड प्रकरणात मृतांचा आकडा 18 वर

pune-pimpri-chinchwad-toxic-liquor-case-18-deaths-methanol-mixing-revelation : अधिक नफ्यासाठी मिथेनॉल मिश्रण केल्याची धक्कादायक माहिती उघड

Pune : hपुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारू प्रकरणात मृतांचा आकडा 18 वर पोहोचला असून या घटनेमागील धक्कादायक माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. अवघ्या दोन दिवसांत अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी-दापोडी परिसरात 12 जणांचा मृत्यू झाला असून पुण्यातील हडपसर परिसरात सहा जणांनी जीव गमावला आहे. याशिवाय काही जणांची प्रकृती अद्याप गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात अधिक नफा कमावण्यासाठी दारूमध्ये मिथेनॉल हे घातक रसायन मिसळण्यात आल्याचे उघड झाले आहे. तपासानुसार, योगेश वानखेडे हा उरळी कांचन परिसरातील बेकायदा देशी दारू उत्पादक राधेश्याम प्रजापती याच्याकडून दारू खरेदी करत होता. 35 लिटरचा एक कॅन सुमारे 1900 रुपयांना खरेदी करून तो पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील विविध ठिकाणी 2700 रुपयांना विक्री करत असल्याचे समोर आले आहे. मात्र अधिक नफा मिळवण्यासाठी दारूचे प्रमाण वाढविण्याच्या उद्देशाने त्यामध्ये ऑनलाइन मागवलेले मिथेनॉल मिसळले जात होते. हेच मिथेनॉल अनेकांच्या मृत्यूचे कारण ठरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. घटनेची गंभीर दखल घेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे. हडपसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मोगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकलगर आणि पोलीस उपनिरीक्षक मुलानी यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोलिस प्रशासनातही खळबळ उडाली आहे.

Manoj jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणावर

या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यापैकी चार आरोपींना न्यायालयाने 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास यंत्रणा या रॅकेटमधील इतर संबंधितांचा शोध घेत असून बेकायदा दारू निर्मिती, पुरवठा आणि विक्रीची संपूर्ण साखळी उघड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी या प्रकरणाबाबत पुणे पोलीस आयुक्तांशी चर्चा केल्याची माहिती देत, विषारी दारू तयार करण्यात आलेले ठिकाण पोलिसांनी शोधून काढल्याचे सांगितले. या प्रकरणामागील प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. गंभीर अवस्थेतील रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांचे प्राण वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घटना अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करत, दोषींना कोणतीही दया न दाखवता कठोर शिक्षा दिली जाईल, असा इशारा दिला आहे. विषारी दारू तयार करणे आणि तिची विक्री करणे हा केवळ बेकायदेशीर व्यवसाय नसून तो थेट मानवी जीवाशी खेळ करणारा गुन्हा असल्याचे त्यांनी सांगितले. “ही एक प्रकारे हत्या आहे,” असे स्पष्ट शब्दांत सांगत या प्रकरणातील संपूर्ण साखळी उघड करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.

Cockroach janata party : ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा सोशल मीडियावर धुमाकूळ; संघ म्हणते ही युवकांची स्वभाविक प्रतिक्रिया

दरम्यान, या दुर्घटनेनंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात बेकायदा दारूविक्री केंद्रांवर धडक कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत. तपासाचा वेग वाढविण्यात आला असून विषारी दारूच्या पुरवठ्यामागील संपूर्ण जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस आणि संबंधित यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत. राज्यातील अलीकडच्या काळातील ही सर्वात गंभीर विषारी दारू दुर्घटना मानली जात असून या प्रकरणामुळे बेकायदा दारू व्यवसायाविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

error: Content is protected !!