Sudhir Mungantiwar Supported an orphaned child, who became a police constable : प्रतिकूल परिस्थितीशी झगडणाऱ्या मुलाला केली मदत, स्वप्नांना मिळाली भरारी
Chandrapur समाजकारण म्हणजे केवळ निवडणुका जिंकणे किंवा राजकीय भाषणे ठोकणे नव्हे, तर एखाद्या अंधारलेल्या आयुष्यात आशेचा दिवा पेटवणे असते, याचा प्रत्यय चंद्रपूरमध्ये आला असून आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडणाऱ्या मूल तालुक्यातील गोलाभुज येथील खुशाल सुरेश गेडाम या अनाथ तरुणाचे पोलीस होण्याचे स्वप्न अखेर साकार झाले आहे.
खुशाल अवघा ९ वर्षांचा असताना २०१२ मध्ये त्याचे वडील सुरेश गेडाम आणि त्यानंतर अवघ्या दोन वर्षांत म्हणजेच २०१४ मध्ये आईचेही निधन झाल्याने त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता, मात्र अत्यंत हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करत त्याने कशीबशी बारावीपर्यंतची पायरी ओलांडली तरी पुढील उच्च शिक्षणासाठी (बी.ए.) पदरी पैसा नसल्याने त्याचे भविष्य अंधारात सापडले होते. शिक्षणाची तीव्र जिद्द असलेल्या खुशालने अखेर राज्याचे माजी मंत्री व स्थानिक आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मदतीची आर्त हाक मारली असता, त्याची ही संघर्षगाथा आणि कौटुंबिक पार्श्वभूमी पाहून आ. मुनगंटीवार यांनी संवेदनशीलतेने तातडीने पावले उचलत सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना विशेष पत्र लिहून खुशालला सिंदेवाही येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळवून दिला.
आमदार मुनगंटीवार यांच्या वेळेवर मिळालेल्या याच एका शिफारस पत्रामुळे खुशालच्या निवासाचा आणि उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आणि पदवी पूर्ण झाल्यानंतर त्याने पोलीस भरतीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शारीरिक व आर्थिक अडचणींवर मात करत सातत्याने मेहनत घेतली. त्याच्या याच अथक परिश्रमांना अखेर यश आले असून त्याची नागपूर येथे कारागृह पोलीस कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली आहे.
Monsoon update : शेतकऱ्यांनी पेरणीची घाई टाळावी, मुख्यमंत्री कार्यालयाचे महत्त्वाचे आवाहन !
आपल्या या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना खुशालने सांगितले की, आई-वडिलांच्या निधनानंतर माझ्या आयुष्यात फक्त अंधार होता, पण आमदार सुधीर मुनगंटीवार साहेब माझ्या पाठीशी आधारवड म्हणून उभे राहिले आणि त्यांच्या एका शिफारस पत्रामुळे मला शिक्षण घेता आल्यानेच आज मी पोलीस दलात दाखल होऊ शकलो असून माझ्या या यशात साहेबांचे योगदान मी कधीही विसरू शकत नाही. एका अनाथ मुलाने शून्यातून निर्माण केलेले हे यश पाहून सध्या संपूर्ण गोलाभुज गावात आनंदाचे वातावरण असून गावकऱ्यांनीही आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संवेदनशील भूमिकेबद्दल आणि योग्य वेळी केलेल्या सहकार्याबद्दल मनापासून आभार मानले आहेत.








